महड : श्री वरदविनायक गणपती | Mahad Ganpati Temple Information In Marathi

प्राचीन काळी गृत्समद नावाचे महान ऋषी होऊन गेले. त्यांनी आपल्या मातेला शाप ला होता. त्या शापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ‘ॐ गं गणपतये नमः।” या मंत्राचा अनेक वर्षे जप करून तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाला. गणेशाने त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यावर गृत्समद ऋषींनी स्वत:साठी काही न मागता गणेशास विनविले की, “तू याच ठिकाणी वास्तव्य करून भक्तजणांची मनोकामना पूर्ण करावी.” विनायकाने ऋषींची प्रार्थना मान्य केली. त्याप्रमाणे विनायक या ठिकाणी राहून भक्तांची इच्छा / मनोकामना पूर्ण करू लागला. या ठिकाणी विनायकाने गृत्समद ऋषींना वर दिला; म्हणून येथील विनायकास ‘वरदविनायक’ असे नामाभिधान प्राप्त झाले. तेव्हापासून हे ठिकाण वरदविनायकाचे स्थळ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे येथील स्थान-महिमा आहे.

श्री वरदविनायक गणपती मंदिर | varad vinayak mandir information in marathi

येथील वरदविनायक मंदिर पूर्व दिशेला मुख असलेले आहे. हे मंदिर बाहेरून पाहताना एखाद्या कौलारू घरासारखे दिसते. आत जाऊन पाहताच कोरीव नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले मंदिर पाहावयास मिळते. मंदिराच्या सर्व दिशांना दोन-दोन हत्ती कोरलेले दिसतात. मंदिराचा घुमट पंचवीस फूट उंच असून त्यावर सोनेरी कळस आहे. मुख्य मंदिरासमोर सभामंडप आहे. मंदिराच्या जवळ देवाचे तळे आहे. उन्हाळ्याशिवाय इतर वेळी तळ्यात पाणी असते. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून नवीन मंदिर अतिदेखणे आणि सुंदर आहे. मात्र मंदिराचा पेशव्यांनी बांधलेला हेमाडपंथी पद्धतीचा गाभारा होता. तो तसाच ठेवण्यात आला आहे. मंदिराजवळ असलेल्या तळ्यात वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सापडली. मात्र ही मूर्ती भग्न झाल्याने त्या मूर्तीचे विसर्जन करून देवस्थानने नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते. श्री वरदविनायक मूर्ती

गाणपत्य सांप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ‘गणानां त्वा’ या मंत्राचे प्रवर्तक ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रष्ट्ये गृत्समद ऋषी यांनी या ठिकाणी श्री वरदविनायकाची स्थापना केली आहे. येथील वरदविनायकाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यात पाषाणाच्या महिरपी सिंहासनावर बैठ्या आसनात असून सिंहासनापासून वेगळी आहे. मूर्ती डाव्या सोंडेची, सुंदर आणि रेखीव आहे. गाभाऱ्यात ऋद्धी-सिद्धीच्या मूर्ती कोरीव पाषाणाच्या असून दोन्ही बाजूंच्या कोनाड्यांत गणेश मूर्ती दिसून येतात.

या तीर्थक्षेत्राची विशेषता

1) मढ, पुष्पक, भद्रक, मणिपूर, अशी या तीर्थस्थळाची पौराणिक नावे आहेत. आताचे प्रचलित रूढ नाव आहे, ‘महड’. यात्रेकरूंनी हे लक्षात ठेवावे की, रायगड जिल्ह्यात महाड नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. महाड आणि महड या नावाबाबत यात्रेकरूंचा गोंधळ होण्याची शक्यता असते. तेव्हा ‘महड’ हे नाव पक्के लक्षात ठेवून ते खोपोलीजवळ, खालापूर तालुक्यात (पुणे-मुंबई महामार्गा- लगतच आहे, हे समजून घ्यावे.
2) हे देवस्थान नवसाला पावणारे आहे असे मानले जाते.
३) देवाचे सेवेकरी / पुजारी वंशपरंपरागत असून वेतन घेणारे आहेत.
4) येथे येणारे यात्रेकरू दुपारी 12 वाजण्यापूर्वी स्वतः करू शकतात.. गणेशाची पूजा
5) यात्रेकरू, भक्त भाविकांसाठी चोवीस तास खुले असणारे हे एकमेव देवालय आहे. दुपारी 12 वाजल्यानंतर कोरडी पूजा करता येते.
6) मुकुट, कुंडले, गोफ हे देवाचे अलंकार आहेत.
7) या मंदिरात इ.स. 1892 पासून आजपर्यंत सतत नंदादीप तेवत ठेवलेला आहे.
8) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत येथे भक्तांना प्रसाद दिला जातो.

येथील उत्सव

या ठिकाणी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मुख्य उत्सव साजरे होतात. श्री गणेशाच्या जन्मोत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या स्त्रियांची ओटी भरण्यात येते. दर संकष्टी चतुर्थीला नेहमीचा उत्सव असतोच.

जवळची प्रेक्षणीय स्थळे

1) खोपोली : बोरघाटाच्या पायथ्याला योगीराज गगनगिरी महाराजांचा मठ / आश्रम
2) खंडाळा, लोणावळा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पुणे-मुंबई महामार्गावरील निसर्गरम्य थंड हवेची ठिकाणे
3) कार्ले : लोणावळ्यापासून पूर्वेला 5 कि. मी. वर महामार्गाच्या उत्तरेला डोंगरात एकवीरा मातेचे मंदिर आणि कोरीव लेणी
4) देहू : पुणे-मुंबई महामार्गापासून आतल्या बाजूला तळेगाव दाभाडेच्या अलीकडे संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत पावन झालेले स्थळ

येथील भोजन आणि निवास व्यवस्था

येथे ‘भक्तनिवास’ असून खाजगी ठिकाणीही भोजन व निवासाची सोय होऊ शकते. देवस्थान तर्फे दुपारी प्रसादाची व्यवस्था आहे.

अंतर

1) पुणे-मुंबई महामार्गावर हाळ या गावाजवळ खोपोलीपासून 4 कि. मी. वर ‘महड’ हे देवस्थान आहे.
2) हाळ या गावापासून महामार्गापासून आत सुमारे 1 कि.मी.वर ‘महड’ हे देवस्थान आहे.

‘महड’ ला कस जायचं…

1) पुणे-खोपोली -महड. पुण्याहून पुणे-मुंबई एस. टी. बसने खोपोली येथे उतरावे. तेथून दुसऱ्या एस. टी. बसने किंवा सहा सीटर रिक्षाने ‘महड’ येथे पोहोचता येते. पुणे येथील शिवाजीनगर किंवा स्वारगेट एस. टी. बस स्थानकातून खोपोलीकडे जाणाऱ्या अनेक एस. टी. बसेस् सुटतात.
2) स्वतःच्या वाहनानेही आपण या ठिकाणी पोहोचू शकता.

हे अष्टविनायक क्षेत्र पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरपासून हाळ या गावाजवळ महड या ठिकाणी वसले आहे. ता.खालापूर, जि.रायगड. पिन – 410202 राष्ट्रीय महामार्गापासून थोडेसे आतल्या बाजूस हे तीर्थस्थळ आहे.

हे सुद्धा नक्की वाचा:-

1) श्री अष्टविनायक यात्रेचे माहात्म्य

2) साडेतीन आद्यपीठा पैकी एक मोरगांवचा श्री मयुरेश्वर गणपती

3) सिद्धटेक श्री सिद्धिविनायक गणपती

4) पाली-श्री बल्लाळेश्वर गणपती

Leave a Comment

error: ओ शेठ