पाली-श्री बल्लाळेश्वर गणपती | Shri Ballaleshwar Ashtavinayak Temple information in Marathi

हे अष्टविनायक क्षेत्र पाली ता. सुधागड, जि. रायगड, खोपोलीपासून पश्चिमेकडे सुमारे 38 कि. मी वर वसले आहे. पिन-410205

पाली – श्री बल्लाळेश्वर गणपती | Shri Ballaleshwar Ashtavinayak Temple information in Marathi

या क्षेत्राची आख्यायिका

या क्षेत्राची आख्यायिका मुद्गल आणि गणेश-पुराणात पाहावयास मिळते. प्राचीन काळी पाली या गावात कल्याण नावाचा व्यापारी बल्लाळ नावाच्या पुत्रासह राहत होता. लहानपणापासूनच बल्लाळाची विनायकावर अपार श्रद्धा होती. तो मोठा होऊ लागला, तशी त्याची गणेशभक्ती वाढू लागली. बल्लाळाच्या संगतीने त्याचे सवंगडीही गणेशभक्तीत रमू लागले. त्यामुळे गावातील मुलांचे दररोजच्या अध्ययन आणि इतर व्यवहारांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे गावातील मुलांचे पालक बल्लाळाच्या पित्याकडे तक्रार करू लागले.

हा प्रकार पाहून बल्लाळाचा पिता खूप चिडला. बल्लाळ त्याच्या सवंगड्यांसह ज्या रानात विनायकाच्या ध्यान-धारणेत मग्न होता, तेथे जाऊन त्याने पूजेतील गणेशाची मूर्ती दूर केली आणि बल्लाळास बेदम चोप देऊन झाडाला बांधून ठेवले.

बल्लाळाने श्री गणेशाची आराधना केली. गणेश त्यास प्रसन्न झाला. पाषाणरूपी मूर्तीत प्रकट होऊन त्याने बल्लाळास वर मागण्यास सांगितले. बल्लाळ म्हणतात, “तू येथेच वास्तव्य कर आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर. हे ठिकाण गणेश क्षेत्र म्हणून उदयास येऊ दे.” अशा प्रकारे गणेशाने बल्लाळाची विनंती मान्य करून ‘बल्लाळविनायक’ असे नाव धारण करून तो या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करू लागला. आणि तेव्हापासून हे क्षेत्र ‘बल्लाळेश्वर विनायक’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

श्री बल्लाळेश्वर मंदिर

येथील ‘बल्लाळेश्वर विनायक मंदिर’ पूर्वाभिमुख आहे. त्याची बांधणी अशा प्रकारे करण्यात आली आहे की, दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे ही थेट विनायकाच्या मूर्तीवर पडतात. बल्लाळाच्या स्वयंभू मूर्तीभोवती भव्य मंदिर उभारले आहे. मंदिराचे बांधकाम चिरेबंदी आणि भक्कम स्वरुपाचे आहे. चिऱ्यांच्या जोडणीत शिशाचा रस ओतलेला दिसून येतो. मंदिराची वास्तुकला देखणी व कलात्मक आहे. या मंदिराला दोन गाभारे आहेत. आत गाभाऱ्यात अष्टदिशांचा मेळ साधून अष्टकोनी कमळ बनवण्यात आले आहे. या गाभाऱ्यावरील शिखरावर कलात्मक कळस उभारण्यात आला आहे.

बाहेरील सभामंडप भव्य असून त्याला सुंदर अशा कमानी आहेत. सभामंडपावर चौघडा-वादनाची माडी आहे. प्रचंड मोठी अशी एक घंटाही आहे. बल्लाळेश्वर मंदिराच्या आधी श्री धुंडीविनायकाचे मंदिर दिसून येते. यातील मूर्ती स्वयंभू आहे. प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

श्री बल्लाळेश्वर मूर्ती

श्री बल्लाळेश्वराची मूर्ती गाभाऱ्यात पाषाणाच्या सिंहासनावर विराजमान आहे. मूर्ती अर्धगोलाकार असून तीन फूट उंचीची व डाव्या सोंडेची आहे. श्रींच्या मस्तकावर मुकुट आहे. श्रींच्या डोळ्यांत आणि नाभीत जडवलेले हिरे मूर्तीवर सूर्याची किरणे पडताच झळाळून उठतात. श्रींच्या मागे चांदीची कलात्मक प्रभावळ असून ऋद्धिसिद्धी त्यावर चवऱ्या ढाळीत उभ्या असलेल्या दिसतात. दुसऱ्या गाभाऱ्यात चांदीने मढविलेला मूषक हातात मोदक घेतलेल्या अवस्थेत उभा आहे.

या तीर्थक्षेत्राची विशेषता

1) सकाळी 8 वाजेपर्यंत स्वहस्ते पूजा करता येते. लघुरुद्र, महापूजा, अभिषेक अशा सेवा करता येतात.
2) येथील पुजारी / सेवेकरी हे परंपरागत आहेत.
3) श्रींच्या गाभाऱ्यात सकाळी 8 नंतर प्रवेश करता येत नाही.
4) मंदिराची व्यवस्था ट्रस्टतर्फे पाहिली जाते.
5) हे मंदिर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे आहे.
6) माघ महिन्यातील चतुर्थीच्या मध्यरात्री प्रत्यक्ष श्री बल्लाळविनायक येथे प्रसादाचे सेवन करण्यासाठी येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
7) पुतळी, हार, कंठा, मुकुट, सेज हे येथील श्रींचे अलंकार आहेत.
8) मंदिराशेजारचे रेखीव बांधणीचे तलाव वातावरणात सौंदर्याची भर घालतात.
9) या स्थळास सरसगडच्या भव्य किल्ल्याची आणि आंबा नदीच्या प्रवाहाची सुंदर पार्श्वभूमी लाभली आहे.

येथील उत्सव

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे दोन उत्सव भव्यपणे साजरे केले जातात. पाचही दिवस कथा-कीर्तनांचे आयोजन करतात. चतुर्थीच्या रात्री श्रींना महानैवेद्य दाखविला जातो. पंचमीला दहीकाला असतो. माघ महिन्यातील उत्सवाला मोठी परंपरा असून मोठ्या संख्येने भक्त-भाविक या उत्सवात सहभागी होतात. तृतीयेला श्रींच्या पालखीची मिरवणूक निघून नगर प्रदक्षिणा करते. पहाटेस काकड आरती महापूजा, सायंकाळी धूपारती आणि रात्री कीर्तनाचे आयोजन केलेले असते. शिवाय, अंगारकी व संकष्टी चतुर्थीला नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा केली जाते.

जवळची प्रेक्षणीय स्थळे

1) सरसगड : या मंदिराजवळच सरसगड नावाचा किल्ला आहे.
2) सुधागड : हा किल्ला असून भृगू ऋषींनी स्थापन केलेले भोराई-देवीचे मंदिर येथे आहे.
3) सिद्धेश्वर : पालीपासून सुमारे 3 कि. मी. वर असलेले शंकराचे स्वयंभू स्थान
4) उद्धर : पालीपासून 10 कि. मी. वर रामाने जटायूचा उद्धार केलेले स्थान
5) उन्हेरे : पालीपासून 3 कि. मी. गरम पाण्याचे झरे असलेले स्थान
6) पुई : येथे एकवीस गणेश मंदिरे आहेत. 7) ठाणाळे : येथे कोरीव लेणी आहेत.

येथील भोजन व निवास व्यवस्था

या ठिकाणी मंदिर परिसरात खाजगी व्यक्तींची घरगुती भोजनाची व्यवस्था आगावू सूचना दिल्यानंतर होऊ शकते.येथील देवस्थानच्या भक्त निवासात निवासाची व्यवस्था आहे. तसेच दुपारी प्रसादाची व्यवस्था आहे.

अंतर

1) पुणे – खोपोली- पाली – सुमारे 111 कि. मी.
2) खोपोली – पाली – 38 कि. मी.
3) मुंबई- पनवेल वाकण – पाली – 120 कि. मी.

पुण्याहून पाली येथे जाण्यासाठी

1) पुणे – मुळशी – तामिनी घाट मार्गे पाली,

2) पुणे – खोपोली – पाली – खंडाळा – बोरघाट मार्गे पाली, असे दोन मार्ग आहेत.

पालीला कसे जाल ?

1) पुणे – खोपोली – रोहा या एस. टी. बसने आपणास पाली येथे जाता येते. ही एस. टी. बस पुणे येथील शिवाजीनगर एस. टी. बस स्थानकातून सुटते.
2) पुणे – खोपोली या मार्गावर अनेक एस. टी. बसेस् धावतात. आपण शिवाजीनगर किंवा स्वारगेट (पुणे) येथील एस. टी. बस स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या एस. टी. बसमधून खोपोली येथे उतरायचे. तेथून दुसरी एस. टी. बस पकडून पालीला जाता येते. तसेच, खोपोलीहून सहा सीटर रिक्षाही पाली येथे जातात.
3) आपल्या स्वत:च्या वाहनाने किंवा खाजगी बसनेही येथे जाता येते.

Leave a Comment

error: ओ शेठ