सिद्धटेक श्री सिद्धिविनायक गणपती | Siddhatek ganpati information in marathi

‘सिद्धटेक’ हे अष्टविनायक क्षेत्र सिद्धटेक ता. कर्जत जि. अहमदनगर येथे भीमा नदीच्या तीरावर वसले आहे.

या क्षेत्राची आख्यायिका

एकदा भगवान विष्णू क्षीरसागरात गाढ निद्रेत असताना त्यांच्या कानांतून मधू व कैटभ असे दोन दैत्य निर्माण होऊन बाहेर पडले. त्यांनी ब्रह्मदेवाला छळायला, त्रास द्यायला सुरुवात केली. अत्याचाराने देव देवता हैराण झाले; म्हणून सर्व देव-देवतांनी भगवान विष्णूंना निद्रेतून जागे केले. विष्णूने त्या दोन्ही दैत्यांशी युद्ध केले; परंतु दैत्य मागे हटत नव्हते, की त्यांचा वध होत नव्हता. सर्व प्रयत्न केल्यावर भगवान विष्णू शिवशंकरांकडे मदतीसाठी गेले.

सर्व हकीगत ऐकून शिवशंकरांनी ‘श्री गणेशाय नमः’ हा षडाक्षरी मंत्र विष्णूला देऊन गणेशाची आराधना करण्यास सांगितले. विनायक विष्णूला प्रसन्न झाला. विष्णूला सिद्धी प्राप्त झाल्यावर विष्णूने मधू आणि कैटभ या दैत्यांचा वध केला. ज्या ठिकाणी भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली, त्या ठिकाणी विष्णूने विनायकाच्या गंडकी शिळेची मूर्ती स्थापन करून मंदिराची उभारणी केली. भगवान विष्णूंना या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली; म्हणून या क्षेत्रास ‘सिद्धटेक’ असे म्हणतात; तर विनायक ‘सिद्धीविनायक’ म्हणून ओळखला जातो. पुढील काळात मूळचे मंदिर लयास गेल्यावर पेशव्यांच्या काळात नवीन ‘सिद्धिविनायक मंदिर’ बांधले गेले.

सिद्धिविनायक मंदिर | Siddhatek ganpati information in marathi

सिद्धिविनायकाचे मंदिर पेशवेकालीन उत्तराभिमुख असे आहे. मंदिरावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. मंदिराचा गाभारा ऐसपैस मोठा आहे. गाभाच्यासमोर बाहेरील बाजूस मोठा सभामंडप आहे. देवाचे शेजघर गाभान्यातच असून बाजूने शिवपंचायतन दिसून येते, मंदिराच्या महाद्वारात चौघडा वादन होते. मंदिरापासून गावाच्या वेशीपर्यंत फरसबंदी रस्ता आहे.

येथील सिद्धिविनायकाचे मंदिर उंच टेकडीवर वसलेले आहे. मंदिराचा गाभारा टेकडीच्या एका बाजूस असल्यामुळे भाविकांना पूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते. हा प्रदक्षिणा मार्ग साधारण एक कि.मी. अंतराचा आहे.

भीमा नदी या ठिकाणी दक्षिणवाहिनी आहे. नदीच्या अशा दक्षिण वाहिनी प्रवाहास फारच पवित्र पावन मानतात. या ठिकाणी नदीला पावसाळ्यात कितीही पूर आला, तरी प्रवाहाचा आवाज होत नाही, असे या क्षेत्राचे वैशिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी नदीतीरावर सुंदर घाट बांधले आहेत.

सिद्धिविनायक मूर्ती

येथील सिद्धिविनायक मूर्ती स्वयंभू असून ती सुमारे तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंदीची आहे. मूर्ती उजव्या सोंडेची, गजमुखी आणि उत्तराभिमुखी आहे. आसनमांडी घातलेल्या विनायकाच्या मांडीवर रिद्धि सिद्धी विराजमान आहेत. श्रींचे सिंहासन पाषाणाचे असून मागे पितळी प्रभावळ आहे. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. प्रभावळीच्या मध्यभागी नागराज दिसून येतात. श्रींच्या उजवी डावीकडच्या बाजूस जय-विजय यांच्या मूर्ती दिसतात.

अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती असलेली दिसून येते. अशा उजव्या सोंडेच्या विनायकास ‘सिद्धिविनायक’ असे म्हणतात. अशा सिद्धिविनायकाचे सोवळे-ओवळे फारच कडक असते.

या तीर्थस्थळाची विशेषता

1) येथील मंदिरात फारच कडक सोवळे पाळले जाते. सर्व पूजा अर्चा पुजारी / उपाध्याय यांच्याकडूनच करण्यात येते. ज्या भक्तांना सहस्रावर्तने करायची असतात, त्याची वेळ सकाळी 7 ते 12 अशी आहे.

2) चिंचवड संस्थानाकडून या देवस्थानाला वर्षासन मिळते.

3) येथील देवाचे पुजारी हे वंशपरंपरागत आहेत. सेवेकरी हे वंशपरंपरागत आहेत.

4) येथील मंदिरात चिंचवडचे मोरया गोसावी यांनी प्रथम तपश्चर्या केली आणि श्री विनायकाच्या आज्ञेनंतर ते मोरगावला गेले.

5) भगवान विष्णू, श्री सिद्धिविनायक, व्यास महर्षी, मोरया गोसावी आदींच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने हे तीर्थक्षेत्र पावन पवित्र झाले आहे.

येथील उत्सव

या ठिकाणी वर्षातून दोनदा उत्सव साजरे करतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माद्य शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या दिवशी उत्सवाचे आयोजन करतात. रात्री श्रींची पालखी निघते. नंतर धूपारती, शेजारती असे कार्यक्रम झाल्यावर श्री निद्रेसाठी जातात.

माद्य शुद्ध चतुर्थीला श्रींची महापूजा करून दुपारी कीर्तन आणि पहाटे श्रींची पालखी निघते.

येथील श्रींची नित्यपूजा साध्या पद्धतीने होते. सकाळी खिचडीचा नैवेद्य; तर दु. 11 वाजता पंचामृत पूजा होते. दुपारी महानैवेद्य दाखवतात. रात्री 8 वाजता धूपारती झाल्यावर श्रीं निद्राधीन होतात.

जवळची प्रेक्षणीय स्थळे

1) पेडगाव भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला –

2) राशीन झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर

3) रेहेकुरी प्राणी-पक्षी अभयारण्य –

4) भिगवण – पक्षी अभयारण्य

5) दौंड – भैरवनाथ व श्री विठ्ठल मंदिर

भोजन व निवास-व्यवस्था

1) या ठिकाणी हॉटेल किंवा भोजनालये नाहीत. भक्तांना मंदिरात उतरता येते.

2) श्री. पुरोहित या क्षेत्रोपाध्यांशी संपर्क साधल्यास निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

3) श्री विठ्ठल-रुक्मिणी लॉजिंग येथे निवास व्यवस्था आहे.

अंतर

1) पुणे- दौंड-शिरापूर – 99 कि. मी. तेथून एक कि. मी. पायरस्ता. नंतर भीमा नदी नावेतून पार करून सिद्धटेक येथे पोहोचता येते.

2) पुणे-दौंड-पेडगाव-सिद्धटेक – 114 कि. मी.

3) अहमदनगर- पारगाव फाटा – श्रीगोंदा- सिद्धटेक – 82 कि.मी.

येथे जाण्याची व्यवस्था

1) पुणे-दौंड, शिरापूर, नंतर भीमा नदी नावेतून ओलांडून सिद्धटेक येथे जाता येते. स्वत:चे वाहन असेल, तर उत्तम.

2) पुणे येथील स्वारगेट एस. टी. बस स्थानकातून थेट सिद्धटेक येथे जाण्यासाठी एस. टी. बससेवा उपलब्ध आहे.

Note – जर तुम्हाला सिद्धटेक श्री सिद्धिविनायक गणपती हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Leave a Comment

error: ओ शेठ