थेऊर – श्री चिंतामणी गणपती मंदिर | Shree Chintamani Vinayaka Temple Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत.

थेऊर – श्री चिंतामणी गणपती मंदिर | Shree Chintamani Vinayaka Temple Information in Marathi

या क्षेत्राची आख्यायिका

या परिसरात कपिलमुनींचा सुंदर आश्रम होता. कपिलमुनींजवळ ‘चिंतामणी’ नावाचे एक रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करीत असे. एकदा या आश्रमात गणासुर नावाचा दैत्यराजा फिरत फिरत आला. कपिलमुनींनी त्या रत्नाच्या साहाय्याने गणासुराला पंचपक्वान्नांचे इच्छाभोजन दिले. हे पाहून गणासुर आश्चर्यचकित झाला. हे रत्न आपल्याजवळ असावे, असे त्याला वाटले. त्याने कपिलमुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. परंतु ते देण्यास मुनींनी नकार दिला; म्हणून गणासुराने ते जबरदस्तीने त्यांच्याकडून हिसकावून घेतले. रत्न परत मिळविण्यासाठी कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली. विनायकाने प्रसन्न होऊन रत्न परत मिळविण्याचे वचन दिले. नंतर विनायकाने गणासुराशी युद्ध करून त्याचा वध केला.

कपिलमुनींना पुन्हा ते रत्न मिळाले. पण त्यांनी ते विनायकाच्याच गळ्यात बांधले. तेव्हापासून या विनायकाचे नाव ‘चिंतामणी’ असे पडले; आणि ‘चिंतामणी’ नाव धारण करून विनायक येथील कदंब वृक्षाखाली वास्तव्य करून भक्त भाविकांच्या मनोकामना पूर्ण करू लागला. ‘कदंबतीर्थ’ म्हणून मग हे क्षेत्र ओळखले जाऊ लागले. पुढे ‘क्षेत्र थेऊर’ म्हणून उदयास आले आणि येथील विनायक ‘चिंतामणी’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

इंद्राने शापातून मुक्ती मिळविण्यासाठी याच ठिकाणी विनायकाची उपासना केली. चिंचवडचे महातपस्वी श्री मोरया गोसावी यांनी येथे तपश्चर्या केली. सध्या या तीर्थस्थळाचे व्यवस्थापन चिंचवड येथील ‘मोरया गोसावी संस्थान’ पाहते.

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी याच मंदिराजवळ वाडा बांधला होता. त्यांचे हे आवडते क्षेत्र होते. आपला शेवटचा काळ त्यांनी मंदिरातच व्यतीत केला. त्यांच्या धर्मपत्नी रमाबाई त्यांच्याबरोबर येथेच सती गेल्या. मुळा-मुठा नदीच्या तीरावर ‘सतीचे वृंदावन’ आजही पाहावयास मिळते. अशा प्रकारचा या ठिकाणाचा पूर्वेइतिहास सांगितला जातो.

श्री चिंतामणी विनायक मंदिर | Chintamani Vinayak Temple Pune

‘चिंतामणी विनायक मंदिर’ गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून मंदिर फारच भव्य आणि देखणे आहे.. उत्तरेकडील महाद्वारापासून ते नदीतीरापर्यंत दगडी फरसबंदीचा रस्ता थेट ‘सतीच्या वृंदावना’ पर्यंत केलेला आहे. सभामंडपाचे बांधकाम थोरले माधवराव पेशवे यांनी केलेले आहे. मुख्य मंदिर चिंचवड संस्थानचे धरणीमहाराज देव यांनी बांधले आहे. पेशव्यांचे सेनापती हरीपंत फडके यांनी मंदिरात काही सुधारणा केल्या आहेत.

सभामंडपाबाहेर पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी अर्पण केलेली भव्य घंटा दिसून येते. मंदिराशेजारील ओवऱ्यांत थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना कलात्मकरीत्या दाखविण्यात आल्या आहेत. तेथेच त्यांचे स्मारकही आहे. मंदिराशेजारच्या पेशव्यांच्या जुन्या वाड्यात सध्या उद्यान केलेले दिसून येते.

श्री चिंतामणी विनायक मूर्ती

येथील ‘चिंतामणी विनायका’ची मूर्ती स्वयंभू आणि डाव्या सोंडेची आहे. चिंतामणीने मांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत सुबक, आणि देखणी आहे. मूर्तीच्या डोळ्यांत माणिक-रत्न मढविलेली दिसतात.

येथील उत्सव

येथील चिंतामणी मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव साजरा करतात. माघ अष्टमीस द्वारयात्रा साजरी करतात. या वेळी गावातील सर्व मंदिरात जाऊन गणेशाची पूजा-अर्चा करतात. अंगारकी आणि संकष्टी चतुर्थीला हजारो भाविक भक्तगण येथील चिंतामणीचे दर्शन घेतात.

या तीर्थस्थळाची विशेषता

1) श्रीमंत माधवराव पेशवे यांनी येथे वाडा बांधला. या ठिकाणी त्यांचे बराच काळ वास्तव्य होते.
2) माधवराव – रमाबाई यांची पुण्यतिथी येथे साजरी करतात.
3) येथून जवळच अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

जवळची प्रेक्षणीय स्थळे

1) भुलेश्वर : दक्षिणेकडे थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगररांगांत भुलेश्वराचे प्राचीन, शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर आहे.
2) केडगाव बेट : श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर पुणे-दौंड मार्गावर केडगाव येथे आहे.
3) रामदरा: थेऊरजवळील लोणी काळभोर या गावातून दक्षिणेकडील डोंगर-पायथ्याजवळ लोणीपासून सुमारे 4 ते 5 कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे. आणि हे एक रमणीय निसर्गस्थळ आहे.
4) उरुळी कांचन : थेऊर फाट्यापासून जवळच पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन येथे म. गांधींनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे.
5) वाडे बोल्हाई मंदिर : वाघोली-केसनंद या मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर आहे.
6) तुळापूर : पुणे-नगर मार्गावर शिक्रापूरपासून जवळ तुळापूर येथे भीमानदीकाठी संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजीमहाराजांचे स्मारक
7) मरकळ : आळंदीजवळ मरकळ येथे भीमानदी तीरावर विपश्यना केंद्र आहे.

भोजन निवास व्यवस्था

1) थेऊर येथे श्रींच्या मंदिर परिसरात देवस्थानचा ‘भक्तनिवास’ आहे.
2) ‘रामकृपा’ या यात्रेकरू-निवासात निवास आणि भोजन-व्यवस्था आहे.
3) श्री. आगलावे यांचे निवास व भोजनालय आहे.

अंतर

1) पुणे-सोलापूर महामार्गापासून आतल्या बाजूला सुमारे 5 कि. मी. पुणे- थेऊर – 25 कि. मी.
2) पुणे-हडपसर – लोणी – थेऊर फाटा – थेऊर या मार्गाने येथे पोहोचता येते.

जाण्याची व्यवस्था

1) हडपसर येथून थेऊर गावापर्यंत पी. एम. पी. एम. एल. ही शहरी बससेवा उपलब्ध. प्रत्येक एक तासाला बसेस सुटतात.
2) आपले स्वत:चे वाहन असेल, तर फारच उत्तम! पुणे शहरापासून जवळच असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी अनेक सुविधा आहेत.अशा प्रकारे थेऊरच्या चिंतामणीच्या स्थळाला भेट देता येते. तसेच, येथून सिद्धटेक येथील सिद्धिविनायक आणि रांजणगाव येथील ‘महागणपती’ या अष्टविनायक स्थळांनाही भेट देता येते.

थेऊर हे अष्टविनायक क्षेत्र पुणे शहरापासून जवळच ता. हवेली, जि. पुणे येथे मुळा-मुठा नदीच्या तीरावर वसलेले आहे. पिन – 412110.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button