श्री अष्टविनायक यात्रेचे माहात्म्य | Ashtavinayak yatra information in marathi

प्राचीन काळापासून भारताला अध्यात्माची महान परंपरा लाभली आहे. ऋषि-मुनींच्या, संत-महात्म्यांच्या आपल्या या भारतभूमीत कोणत्याही धार्मिक स्थळांची यात्रा ही फारच महत्त्वाची मानली जाते. पवित्र-पावन तीर्थस्थळांचे मनोभावे, श्रद्धापूर्वक अंत:करणाने घेतलेले दर्शन म्हणजे यात्रा. देव-देवतांची निवासस्थाने म्हणजे पावन न पवित्र तीर्थस्थळे होय. अशा पावन तीर्थस्थळी हजारो वर्षे होत असलेल्या भजन पूजनातून आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपण परमश्रद्धेने अशा स्थळांना भेट देतो, त्या वेळी ही अध्यात्मिक ऊर्जा आपल्या तना-मनाला ताजेतवाने, उल्हसित आणि आनंददायी करीत असते. आपल्याला पुढील जीवन आनंदाने, कार्यकुशलतेने जगण्यासाठी नवी उमेद, नवा उत्साह, नवे बळ प्रदान करते. अशा प्रकारचे आनंददायक आध्यात्मिक अनुभव प्राप्त करण्यासाठी आपण तीर्थस्थळांच्या यात्रा करीत असतो.

श्री अष्टविनायक यात्रेचे माहात्म्य | Ashtavinayak yatra information in marathi

आपला महाराष्ट्र ही तर पावनभूमी! संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ अशा महान संतांनी या भूमीत अध्यात्माचे बीजारोपण केले, आणि रुजविले. अशा आपल्या महाराष्ट्रात तीर्थस्थळांची मांदीयाळी सर्वत्र पाहायला मिळते.

महाराष्ट्रातील बरीचशी तीर्थस्थळे निसर्गरम्य, मनाला भावणाऱ्या, फुलविणाऱ्या ठिकाणी वसलेली आहेत. रमणीय निसर्गात थोडा वेळ का होईना, रमल्याने तना-मनाचा थकवा हलका होण्यास, दूर होण्यास मोलाचा हातभार लागतो.

अष्टविनायक यात्रा

माणसाचे आजचे जीवन हे अत्यंत धकाधकीचे, धावपळीचे झाले आहे. सिमेंटच्या जंगलात आणि ‘प्रदूषित वातावरणात त्याला आला दिवस ढकलावा लागत आहे. मऊ, मुलायम हिरवळीवर थोडे तरी लोळावे, डोंगर-दऱ्यांतून फेरफटका मारावा, निर्मळ झऱ्याचे गार पाणी पिऊन शरीर सुखवावे, झाडाखाली बसून धरून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घ्यावा, यासाठी माणसाचे मन व्याकुळ झाले आहे, आसुसले आहे; आणि नेमक्या अशाच ठिकाणी आपली तीर्थस्थळे दिसून येतात. अनेक तीर्थस्थळांच्या यात्रा कराव्यात, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, वेळ, पैसा, वय, हवामान अशा गोष्टींचा विचार करूनच कोणत्या तीर्थस्थळाची यात्रा करायची, हे ठरवावे लागते. त्यातल्या त्यात कमी वेळात, कमी पैशात जवळच्या जवळ सहज करता येण्यासारखी यात्रा म्हणजे ‘अष्टविनायक यात्रा’ होय.

आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणपतीची अत्यंत सुंदर, स्थापत्यकलेचे उत्तम दर्शन घडविणारी मनभावन अशी मंदिरे आहेत. त्यातील काही गणपती हे ‘अष्टविनायक’ म्हणून ओळखले जातात. मोरगावचा मयूरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नहर, महडचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर हे अष्टविनायक म्हणून मानले जातात.

गणपती हे सर्वांचे आवडते आराध्यदैवत होय. अनेक भक्त परमश्रद्धेने श्री गणेशाची उपासना, आराधना करीत असतात. आपले इच्छित कार्य सिद्धीस जावे, सफळ व्हावे; म्हणून शुभकार्याच्या प्रारंभी गणेशाचे दर्शन घेऊन त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. गणेश हा सुखकर्ता, विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा दायक आहे, म्हणूनच मानवी जीवनाला सत्य, शिव, सुंदरतेचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या गणेश-उपासनेचे आणि त्याच्या चरणी लीन होण्याचे ‘अनन्यसाधारण महत्त्व अष्टविनायक यात्रेत दिसून येते.

‘अष्टविनायक’ हे वेगवेगळ्या ठिकाणी वसलेले आहेत. या स्थळांना भेटी देण्याचा एक क्रम असतो. त्याबद्दल एका श्लोकात मार्गदर्शन केलेले आहे. त्या क्रमानुसार गणेशभक्तांनी ‘अष्टविनायक दर्शन-यात्रा’ केल्यास परमसुख प्राप्त होते, असे सांगितले आहे.

यात्रेचा क्रम खालीलप्रमाणे :

  1. मोरगाव
  2. सिद्धटेक
  3. पाली
  4. महड
  5. थेऊर
  6. लेण्याद्री
  7. ओझर
  8. रांजणगाव

अशी दर्शन-यात्रा करतात. आपले स्वत:चे वाहन असेल, तर उत्तम! नसेल, तर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाने आपण प्रवास करू शकता. यात्रेसाठी निघताना बरोबर काय-काय असावे, हे तर आपणास निश्चितच माहिती असते. तरीसुद्धा हल्ली बऱ्याचशा गोष्टी बाहेर मिळू शकतात. पाणी हा घटक नेहमी लक्षात ठेवावा. पाणी नेहमीच पिण्यालायक असावे. तसे ते मिळेलच, याची फारशी खात्री देता येत नाही; म्हणून पाण्याची व्यवस्था आपली आपणच करणे हे इष्ट असते. बाकी इतर काळजी करण्यासारखे काही नसते. तर आता आपण प्रथम भेट देऊ या, ती मोरगावला.

Note – जर तुम्हाला श्री अष्टविनायक यात्रेचे माहात्म्य हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button