साडेतीन आद्यपीठा पैकी एक मोरगांवचा श्री मयुरेश्वर गणपती

मोरगावचा मयूरेश्वर हे श्री गणेशाचे आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रात जशी देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात, त्याचप्रकारे श्री गणेशाची साडेतीन आद्यपीठे मानतात. मोरगावच्या श्री गणेशाला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात.या आद्यपीठाचे माहात्म्य मुद्गल पुराणात सहाव्या खंडात वर्णन केलेले पाहावयास मिळते. याबाबत एक कथा सांगितली आहे.

या क्षेत्राची आख्यायिका

प्राचीन काळातल्या गंडकी नगरात सिंधू नावाचा दैत्यराजा राज्य करीत होता. सिंधूने सूर्याची उपासना करून स्वतःला अमरत्व प्राप्त करून घेतले होते. यामुळे त्याला कसलीही भीती किंवा धाक वाटत नव्हता. तो उन्मत्त, गर्विष्ठ झाला. आपण त्रैलोक्याचे राज्य मिळवावे, त्रैलोकाचा स्वामी व्हावे, ही महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली. अत्याचार करून त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर आक्रमण करून त्याने इंद्राचा पराभव केला. स्वर्गाचा अधिपती होऊन तो सत्ता गाजवू लागला. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचाही पराभव करून त्याने सर्व देव-देवतांना. बंदीवासात टाकले.

हे संकट दूर करण्यासाठी सर्व देवांनी श्री गणेशाकडे धाव घेऊन त्याला सिंधुदैत्याचे संकट दूर करण्याची विनंती केली. देवाच्या विनंतीला मान देऊन गणेशाने संकट दर करण्याचे अभिवचन दिले. दूर

त्यानुसार गणेशाने शंकर-पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. सिंधू या दैत्याशी युद्ध करून त्याचा आणि कमलासुराचा वध केला. या ठिकाणी गणेशाने मोरावर स्वार होऊन हे युद्ध केले. मोरावर बसून असुरांचा संहार करणारा ईश्वर, म्हणून गणेशाला श्री मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे नामाभिधान प्राप्त झाले. ज्या ठिकाणी या दैत्यांचा वध होऊन देव संकटमुक्त झाले, तेच हे स्थळ होय. ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य या पाच देवतांनी या स्थळी अनुष्ठाने करून गणेशपीठाची स्थापना केली. येथील मंदिर ब्रह्मदेवाने उभारले, असे सांगितले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील श्लोकात ब्रह्मदेवाचा उल्लेख आढळून येतो. अशा प्रकारे मोरगावचे प्राचीनत्व आणि येथील श्री गणेशाचा महिमा कळून येतो.

श्री मयूरेश्वर मंदिर

मोरगाव हे तीर्थस्थळ कहा नदीच्या तीराजवळ वसलेले आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी मंदिर असून पेठेत प्रवेश करताच मंदिराचे भव्य दर्शन घडते. मंदिर गढीसारखे असून त्यास पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिर चिरेबंदी असून उत्तराभिमुख आहे. चार बाजूंच्या चार कोपऱ्यांत चार स्तंभ आहेत. मंदिरात प्रवेश करताच भव्य दगडी उंदीर आणि चौथऱ्यावर बसलेला पंधरा फूट उंचीचा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. नंदीचे तोंड गणेशाच्या दिशेकडे असून गणेशाच्या समोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे. सभामंडपात आठ दिशांना एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण आणि वक्रतुंड अशा गणेशाच्या प्रतिमा दिसून येतात. मंदिरात असलेल्या भैरवाचे दर्शन घेऊनच नंतर गणेशाचे दर्शन घेण्याची येथील प्रथा आहे. मंदिराच्या आवारात असणाऱ्या शमीच्या वृक्षाखाली बसून भक्तगण ध्यान-धारणा करतात. तेथेच अनुष्ठान केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. आवार फरसबंदी असून मंदिरापुढे सुंदर घडणीच्या दगडी दीपमाळा आहेत.

मयूरेश्वर मूर्ती

मुख्य मंदिरातील श्रींची मूर्ती शेंदूरचर्चित, डाव्या सोंडेची आणि अत्यंत देखणी आहे. गणेशाच्या मस्तकावर नागराज फणा धरून आहेत. गणेशाच्या नाभीत आणि डोळ्यांत हिरे जडवलेले आहेत. श्रींच्या डावी उजवीकडे सिद्धि-बुद्धीच्या मूर्ती आहेत. श्रींच्या समोर मोर आणि मूषक दिसून येतात. नगारखान्यात नगारा वादन नेहमी सुरू असते.

महान गणेश-उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थळ. त्यांना कऱ्हा नदीच्या पात्रात गणेशमूर्ती मिळाली. त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना चिंचवड येथे केली. मोरगाव या तीर्थस्नानाचे व्यवस्थापन चिंचवडच्या देवस्थानाकडे आहे. चिंचवड येथील श्रींची पालखी वर्षातून दोन वेळा येथे येते.

श्रींच्या पूजेचा नित्यक्रम

श्रींच्या षोडशोपचार पूजा नित्यनेमाने केल्या जातात. चारकाल नित्य पूजेमध्ये पूजा, पंचोपचार पूजा, प्रक्षाळ पूजा अशा पूजा होतात. श्रींना पूजेनंतर नित्य नैवेद्यही दाखवला जातो. भाविकांसाठी पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. त्यानंतर श्रींना शेजघरात निद्रेसाठी नेले जाते.

येथील उत्सव

येथील विजयादशमीचा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. श्रींना तोफांची सलामी देतात. श्रींची पालखी गावात मिरवली जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, तसेच माद्य शुद्ध चतुर्थी या दिवशी विशेष उत्सवाचे आयोजन करतात.

या तीर्थस्थळाची विशेषता

येथे श्रींची वैयक्तिक पूजा करता येत नाही. वंशपरंपरागत पुजारी सर्व व्यवस्था पाहतात.

भोजन व निवासव्यवस्था

भाविकांना पुजारी / उपाध्ये यांच्या घरी उतरण्याची सोय आहे. तेथे घरगुती पद्धतीचे भोजन मिळू शकते. हिवाळ्यात भाविकांची जास्त गर्दी दिसून येते. येथील

1) श्री माहेश्वरी भक्त निवास आणि

2) मेवाड भोजनालय या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते.

मोरगावजवळची इतर दर्शनीय रम्य स्थळे –

1) पांडेश्वर- पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर

2) कऱ्हा नदी तीरावर जडभरताचे स्थान. नदीतीरावरील शिवमंदिर

अत्यंत प्रेक्षणीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना

3) जेजुरी – श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे प्रसिद्ध स्थळ

4) लवथळेश्वर – शिवमंदिर- जेजुरीपासून सुमारे 2 कि. मी अंतरावर

5) सासवड – श्री संत सोपान महाराज समाधी

6) नारायणपूर- एकमुखी दत्ताचे मंदिर. शेजारीच नारायणेश्वराचे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर. जवळच श्री बालाजी मंदिर, तसेच पुरंदर किल्ला

अंतर

1) पुणे – सासवड-मोरगाव- सुमारे 64 कि. मी.

2) पुणे – सोलापूर मार्गाने चौफुला ते मोरगाव- 77कि. मी.

3) जेजुरी मोरगाव- 17 कि. मी.

येथे जाण्याची व्यवस्था

1) पुणे – स्वारगेट येथून एस. टी. बससेवा उपलब्ध

2) पुणे – मिरज रेल्वेने, जेजुरीला उतरून तेथून एस. टी. अथवा खाजगी वाहनाने मोरगावला जाता येते. अशा प्रकारे आपण मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन इतर ठिकाणी जाऊ शकता.

‘मोरगाव’ हे अष्टविनायक-क्षेत्र कऱ्हा नदीकाठी ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी वसले आहे. पिन – 412304

Note – जर तुम्हाला मोरगांवचा श्री मयुरेश्वर गणपती हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button