हृदयविकार, डोकेदुखी, अपचन यावर उपाय ‘ वेलची’ |Health Benefits of Cardamom in Marathi

मुखशुद्धीसाठी वेलची (Cardamom) खातात. कारण ती सुंगधी आहे. पानाच्या विड्यात वेलची टाकली तर पानाचा स्वाद अधिकच वाढतो. मुरंब्यात, सरबतात आणि विविध मिठाईमध्ये तसेच बासुंदीत वेलची सर्रास वापरतात. वेलचीचा परिचय आपल्याला यातून होतो. परंतु केवळ स्वाद म्हणून वेलचीकडे पाहू नका ! तिचा बहुमोल असा औषधी गुणधर्मही आहे. उलटी, खोकला, डोक्याचे रोग, मूत्राशयाचे रोग, रक्तविकार, हृदयविकार अशा अनेक रोगांत वेलची हे प्रभावी औषध आहे. एकेक वेलचीचा दाणा म्हणजे औषधाची जणू रामबाण गोळीच!

हृदयविकार, डोकेदुखी, अपचन यावर उपाय ‘ वेलची’ | Health Benefits of Cardamom in Marathi

वेलचीला बेलदोडा असेही म्हणतात. वेलची अत्यंत पाचक आहे. खाल्लेले अन्न पचन होत नसेल, अपचन होऊन करपट ढेकरा येत असतील किंवा भूकच लागत नसेल तर वेलदोड्यासारखे दुसरे औषध नाही. दहा वेलची अर्धा लिटर पाण्यात उकळवा आणि कपभर पाणी करा, हे पाणी थोडे थोडे सरबतासारखे प्या. थोड्याच वेळात अजीर्ण अथवा अजीर्णामुळे होणारा त्रास कमी होईल.पोट फुगल्यावर वेलची हे उत्तम औषध आहे. अर्धा ग्रॅम वेलदोड्याच्या चूर्णात पाव ग्रॅम भाजलेला हिंग घालून लिंबाच्या रसातून दिल्यास कोणत्याही कारणाने फुगलेले पोट त्वरित उतरते असा अनेक वैद्यांचा अनुभव आहे.

भारतात केरळ आणि मद्रासमध्ये वेलचीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मलबारमधून दर वर्षी शेकडो मण वेलची इंग्लंड व इतर देशांमध्ये निर्यात केली जाते. आता महाराष्ट्रातही वेलचीच्या उत्पादनाला प्राधान्य द्यायला सुरुवात झाली आहे.

लघवीचे विकार आणि वेलची

लघवीची जळजळ होत असेल तर वेलचीचा चहा गुणकारी आहे. दहा वेलच्या बारीक ठेचून त्यात दोनशे मिलीलीटर पाणी आणि दोनशे मिलीलीटर दूध घालून निम्मे होईपर्यंत उकळवावे. त्यात साखर घातली की झाला वेलचीचा चहा ! हा चहा दिवसातून चार वेळा घ्यावा. त्याने लघवी करताना होणारी आग पार जाते.

लघवी करताना होणारी आग व लघवीतील खर जाते त्यावर आणखी साधा उपाय म्हणजे वेलदोडे व कलिंगडाच्या बिया समप्रमाणात कुटून त्या दोनशे ग्रॅम दूध व तितकेच पाणी एकत्र करून उकळवा. अर्धे झाल्यावर ते नियमित घ्या. त्याने लघवी पार साफ होईल आणि खर पडण्याचेही थांबेल.लघवीतून धातू पडत असल्यास वेलचीचे दाणे व भाजलेला हिंग तुपात अथवा दुधात घालून दिल्यास धातू रोखला जातो.

मूळव्याध, रक्तप्रदर आणि वेलची

मूळव्याध आणि स्त्रियांमध्ये आढळणारा रक्तप्रदर या विकारात वेलचीच्या दाण्यांसोबत आणखी काही औषधे घातल्यास उत्तम औषध तयार होईल.केशर, जायफळ, वासकपूर, नागकेशर, शंखजिरे आणि वेलचीचे दाणे

समप्रमाणात घेऊन त्या सर्वांची वस्त्रगाळ पूड तयार करा. त्यातील दोन मासे चूर्ण तेवढाच मध आणि सहा मासे गाईचे तूप व तुपाच्या अर्धी साखर मिसळून दररोज दिवसातून तीन वेळा सकाळ, दुपार व संध्याकाळी घ्या. असे किमान चौदा दिवस करा. या चौदा दिवसांत गूळ, खोबरे, कोंबडीचे मटण असे गरम पदार्थ टाळा. मूळव्याध, रक्तप्रदर या विकारांत फारच फायदा होतो.

हातापायाची, लघवीची आग थांबते

आवळ्याचा रस किंवा चूर्णाबरोबर वेलची खाल्ल्यास तापायाची आग, लघवीची जळजळ, शरीराचा दाह थांबतो. डोळे सतेज बनविणारा वेलची बदाम हलवा वेलची बदाम हलवा शक्तीदायक आहे आणि डोळ्यांना ताकद देऊन डोळे सतेज करणारा आहे.

वेलची बदाम हलवा बनविण्यासाठी रीत अशी की, वेलचीचे दाणे वासकपूर व बदाम प्रत्येकी पाच तोळे घ्यावे. ते पाण्यात भिजवावेत. त्यानंतर पाणी काढून टाकावे व पाच तोळे पिस्त्यासह वाटावेत. हा गोळा दोन शेर दुधात टाकून दूध शिजवावे. दूध घट्ट होताना पाऊणशेर साखर मिसळावी. मंद आच द्यावी. हलव्याप्रमाणे घट्ट बनल्यावर त्यावर चांदीचा वर्ख लावावा. हा वेलची बदाम हलवा रोज दोन ते तीन तोळे खावा ! शक्ती येते व डोळे सतेजही बनतात.

डोळ्यांचे आरोग्य सुधारा

डोळ्यांचे आरोग्य वाढण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे वेलचीचे वस्त्रगाळ चूर्ण व साखर समप्रमाणात घेऊन त्यात एरंडेल तेल मिसळावे व ते दीर्घकाळ डोळ्यांत घालावे. डोळ्यांना थंडावा प्राप्त होतो व तेज वाढते.

असे आहेत वेलचीचे उपयोग ! वेलची आकाराने लहान पण गुणाने महान आहे. म्हणून वेलचीकडे औषध म्हणून पहा तीही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आरोग्य देईल. आपण वाट चुकलो, भटकत राहिलो तर रस्त्यावरील एखादे मूल आपणास वाट दाखविते आणि इष्ट स्थळी पोहोचविते. तसेच आहे या वेलचीचे ! मूर्ती लहान पण कीर्ती महान.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button