जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनाबद्दल माहिती | International Day for the Eradication of Poverty

संपूर्ण जग जवळपास गेले दीड वर्ष कोव्हीड- 19 महामारीचा सामना करत आहे. यामुळे कित्येक माणसांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न शून्यावर आले आणि जग जवळपास 10 वर्ष मागे गेलं. या महामारीने जगातील विशेष करून दक्षिण आशियायी आणि सहारा प्रदेशातील देशांमधील 10 ते 15 कोटी लोकांना गरिबीच्या दरीत ढकलले आहे. अजूनही ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज लावणे जवळपास अशक्यच आहे. कोरोना आधीच सीरियन अरब प्रजासत्ताक आणि येमेन प्रजासत्ताकातील संघर्षांमुळे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेमधील गरिबीचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले होते.

एका सर्वेक्षणानुसार जगातील 10% लोकांकडे जगातील 90% संपत्ती एकवटलेली आहेत. उर्वरित 10% संपत्तीमधील जवळपास 90% संपत्ती मध्यमवर्गीयांकडे आहे. हे कितीही अन्यायकारक वाटले तरी हेच वास्तव आहे. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब हा भेद मिटवणं जवळपास अशक्यच आहे. परंतु, गरिब जनतेला किमान आपल्या मुलभूत गरजा भागवून उत्तम आयुष्य जगता येईल यासाठी विशेष तरतूद करणं आवश्यक आहे. गरिबी विरोधात लढा देण्यासाठी दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी “जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन” साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय गरिबी समाप्त दिवस | International Day for the Eradication of Poverty

जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन

इतिहास ‘जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनाचा’ कार्यक्रम सर्वप्रथम 17 ऑक्टोबर 1987 रोजी पॅरिसमधील (फ्रान्स) ट्रॉकाडोरो येथील ह्यूमन राइट्स आणि लिबर्टीज प्लाझा येथे साजरा करण्यात आला होता. त्या दिवशी तिथे एक लाखांहून अधिक लोक जमले होते. कशासाठी, तर गरिबी, उपासमार, हिंसा आणि भीती या साऱ्यांसोबत आयुष्य कंठणाऱ्या पीडितांना सन्मानित करण्यासाठी. आंतरराष्ट्रीय चळवळी एटीडी फोर्थ वर्ल्डचे संस्थापक जोसेफ व्रेन्स्की यांनी दारिद्र्य निर्मूलनाच्या या कार्यक्रमची पायाभरणी केली होती. त्यानंतर, 1992 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने यास अधिकृतपणे मान्यता दिल्यावर दरवर्षी 17 ऑक्टोबर हा दिवस जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन” म्हणून साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबीच्या समस्येविषयी जनजागृती वाढवून गरिबांना व त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणे तसेच एकूणच जागतिक स्तरावर गरीबी निर्मूलनासाठी कार्य करणे हा आहे.

गरिबी कित्येक समस्यांचे मूळ

गरिबी ही समस्या अनेक समस्यांचे मूळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामुळे निरक्षरता, बालमजुरी, बालविवाह, बाल तस्करी, गुन्हेगारी अशा समस्या निर्माण होतात आणि दिवसेंदिवस त्या वाढतच जातात. गरीब व्यक्तींसाठी अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजांसोबतच शिक्षण, आरोग्य, न्याय, अशा सामाजिक गरजा भागवणेही एक मोठे आव्हान असते. कित्येक मुलांना गरिबीमुळे इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. गरिबीमुळे अगदी धोकादायक ठिकाणी आणि धोकादायक परिस्थितीतही लोकांना काम करावे लागते. यामुळे त्याच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होतात, परंतु, आरोग्य खर्च भागवण्यासाठी पुरेसा पैसा नसतो किंवा जमलेली पुंजी त्यातच खर्च होते. यामुळे अशा कुटुंबाना गरिबीतून बाहेर काढणे ही अत्यंत अवघड होऊन बसते.

दरवर्षी जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनानिमित्त विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेळावे आयोजित केले जातात. काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या टपाल प्रशासनाने “We Can End Poverty (आम्ही दारिद्र्य संपवू शकतो)” या विषयावर सहा स्मृती तिकिटे आणि स्मरणिका कार्ड जारी केले होते. यामध्ये गरीबीविरुद्धच्या लढाईत एकत्र काम करणाऱ्या लोकांची, विशेषत: मुलांची रेखाचित्रे किंवा चित्रे होती. हे शिक्के एका कला स्पर्धेद्वारे निवडण्यात आले होते ज्यामध्ये 124 देशातील 12000 हून अधिक मुलांनी भाग घेतला होता. यामधून केवळ सहा डिझाईन्स निवडल्या गेल्या होत्या. दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध देशाच्या सरकारसह काही समाजसेवी संस्थाही नियमितपणे प्रयत्न करत असतात. सरकार तसेच या संस्थांकडून गरिबी निर्मूलनासाठी विविध योजना व कार्यक्रम राबवले जातात. सरकारतर्फे त्यांना शिक्षण, आरोग्य व आहारासाठी विशेष सुविधा देण्यात येतात. तसेच त्या गरिबांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. परंतु, गरिबीचे प्रमाण इतके जास्त आहे की या समस्येचे समूळ उच्चाटन करणे जवळपास अशक्यच म्हणावे लागेल.

Note – जर तुम्हाला International Day for the Eradication of Poverty information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि sharechat वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button