महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व ‘पु. ल. देशपांडे’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Pu La Deshpande Biography in Marathi

महाराष्ट्राच्या संस्कृतीत अशी काही व्यक्तिमत्वं आहेत ज्यांची ओळख करून देणं म्हणजे चक्क सुर्याला प्रकाश दाखविण्यासारखे आहे. एक असा अवलिया त्यांची ओळख काही शब्दात करणे अशक्य आहे. लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा नानाविविध छटांमध्ये सामावलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल.देशपांडे

‘पु. ल. देशपांडे’ यांच्या जीवनाबद्दल माहिती | Pu La Deshpande Biography in Marathi

पु.ल. या दोन अद्याक्षराचे गारुड युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत आजही कायम आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वयात, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी पुलं म्हणजे ‘अपना पुराना याराना है’ म्हणण्यासारखं आहे. आजच्या काळातही पुलंचे मार्मिक विनोद मनाला उभारी देतात. कोरोना सारख्या महामारीच्या काळात मानसिक संतुलन राखण्यासाठी किती तरी लोकांनी पुलंच्या साहित्याचा आणि त्यांच्याकडून निर्मित विविध नाट्य, चित्रपटांचा आधार घेतला असेल. पुलं म्हणजे भाईंच्या साहित्याने मध्यम वर्गाला हसायला शिकवले. मराठी जनांना सुसंस्कृतता ही मुल्यं किती अमुल्य असते याचा प्रत्यय दिला.

व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, गणगोत, मैत्र, गुण गाईन आवडी, खिल्ली, हसवणूक-फसवणूक, नस्ती उठाठेव, मराठी वाड्मयाचा (गाळीव) इतिहास, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, वंगचित्रे, एक झुंज वाऱ्याशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, तुका म्हणे आता, नवे गोकुळ, पुढारी पाहिजे, विठ्ठल तो आला आला, तीन पैशाचा तमाशा…. किती नावे सांगावित त्यांच्या पुस्तकांची? असंख्यांनी असंख्य वेळा वाचली असतील ती पण आजही वाचली तरी अपार आनंद आणि समाधान या पुस्तकांमधून मिळतं. पुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मुलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली.

वयाच्या 12व्या वर्षापासून पु. ल. देशपांडे यांनी स्वतःची भाषणे लिहायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले. घरात वाचनाची, संगीताची बैठक होती त्यामुळे लहानपणापासून सांस्कृतिक वारसा जपला गेला. घरीच ते पेटी वाजवायला शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली आणि बालगंधर्वांनी त्यांना शाबासकी दिली होती. पु.लंच्या आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात विविधता होती. शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या ‘माझिया माहेरा जा’ या कवितेला चाल लावली होती. कॉलेजमध्ये असतानाही त्यांनी गायन, वाचन, लेखन ही कला जपली आणि अधिक फुलवली होती.

पुलंचं लेखन म्हणजे एक अथांग समुद्र असंच म्हणायला हवं त्यातील एक मोती म्हणजे बटाट्याची चाळ. मुंबईतील मराठी चाळजीवनाचे आत्मवृत्त असंच म्हणा ना. हे पुस्तक आणि त्यावरील बहुरूपी प्रयोग तुफान गाजले. आजही युट्युबवर ‘बटाट्याची चाळ’चा व्हिडीओ आवर्जून पाहिला जातो. पुलंचा जन्म चाळीत झाला त्यानंतर देशपांडे कुटुंब विलेपार्ले येथे राहायला आलं. या वास्तूंचा पाया चाळकरी मराठी संस्कृतीचा होता. त्यामुळे पुलंना मुंबईतील चाळ संस्कृतीवरील बाळकडू लहानपणापासून मिळालं. माणसांतील विविधतेत रमलेल्या पुलंना अशी घाऊक विविधता अन्यत्र कुठे सापडणार? मग काय कलावंत म्हणून त्यांनी एक अजरामर कलाकृती तयार केली ती म्हणजे ‘बटाट्याची चाळ’. ‘सामान्यांची ही नि:श्वसिते | जीवन न्यारे इथे स्पंदते’ असे खुद्द पुलंनीच तिचे वर्णन केले आहे.’ पुलं सनातनी मुळीच नव्हते पण जुन्यातील सारेच त्याज्य, असे मानणारेही नव्हते. मुलभूत मुल्ये जुनी म्हणून टाकाऊ होत नसतात यावर त्यांचा विश्वास होता. महाराष्ट्राला व्यंगातून हसवणारा, त्या हसवण्यात पण बरंच काही शिकवून जाणारा, चाळसंस्कृतीमध्ये जन्म होऊन ती मुल्ये साहित्यिक माध्यमातून जनमानसातील पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या ध्रुवताऱ्याची आज जयंती आहे. पुलंनी एका ठिकाणी म्हटलं होतं, “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका.

साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” पुलंची ही वाक्यं आयुष्यात कायम लक्षात ठेवा आपल्या जीवनाचा आनंद आपण अधिक चांगल्याप्रकारे घेवू शकू. भाईंच्या 102व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

Note: जर तुमच्याकडे Biography of Pu La Deshpande in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Pu La Deshpande information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button