उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी कोणती पेयं आरोग्यदायक आहेत? | Which drinks are healthy to cool down in summer?

उन्हाळा सुरू झाला आहे. जोरात फॅन, एअर कंडिशन, कूलर वापरून थंड हवा घ्यायला सुरुवात झाली आहे. तसेच अजून थंडावा मिळावा अशी इच्छा असते म्हणून फ्रिजमधलं थंड पाणी, बर्फाचे खडे चावणे, कार्बोनेटेड थंड पेये, गाड्यावरील बर्फाचे गोळे खाणे असे प्रकार चालू असतात. पण आपल्या भारतीय हवामानानुसार जी पेयं उन्हाळ्यात प्यायला हवीत त्याबद्दलची माहिती अनेकांना नसते. त्यासाठीच या उन्हाळ्यात अपायकारक नसणाऱ्या पण शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या पेयांची माहिती घेऊ.

उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी कोणती पेयं आरोग्यदायक आहेत? | Which drinks are healthy to cool down in summer?

उसाचा रस

उसाचा रस हा खूप फायदेशीर आहे. याचं सेवन केल्यानं त्वचेचं आरोग्य नीट राहतं. तसेच उन्हाळ्यात घामामुळे होणारे मुरमे, चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यास मदत करते. आपल्या त्वचेतला ओलावा टिकून राहतो. तसेच उन्हाळ्यात शरीरातली पाण्याची पातळी सतत कमी होत असते. उसाच्या रसाने ही पातळी सुरक्षित राहते. उसाच्या रसातून खूप उर्जा शरीराला मिळते. हे एक योग्य एनर्जी ड्रिंक आहे.

दही

उन्हाळ्यात मस्त आंबट गोड घट्ट दह्याचा आहारात आवर्जून समावेश करावा. उन्हाळ्यात पोटात जळजळल्या सारखं होतं. पण दहयामुळे यावर लगेच आराम मिळेल. ज्यांची प्रकृती पित्तकारक आहे, त्यांनी उन्हाळ्यात दही खायलाच हवं. कारण उष्णतेमुळे शरीरात आम्लपित्ताचं प्रमाण वाढतं ते दह्यामुळे कमी होतं. पोटाच्या समस्यांवर ही दही गुणकारी आहे. दह्यात असलेले पोषक घटक प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्व ब 6 आणि ब 12 ज्यामुळे शरीराच्या योग्य पोषणास मदत होते.

ताक

उन्हाळा आला आणि ताक पिणं झालं नाही असं होत नाही. या काळात आपण घरात असलो किंवा घराबाहेर असलो तरी पण आपण ताक प्यायलो तर शरीराला थंडावा मिळतो. पण यांत बर्फ घालू नये. कारण पोटातला दाह कमी करणे हा ताकाचा गुणधर्म आहे. ताक प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. ताकाच्या आहारातल्या समावेशामुळे आतड्याचे आजार आणि पोटासंबंधीचे विकार दूर होतात. ताकात प्रथिने, कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी याचा उपयोग होतो.

नारळ पाणी

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्याची खूप गरज असते. आणि या दिवसांत जर नारळ पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप लाभकारक आहे. नारळपाणी हा कर्बोदकांचा एक उत्तम स्त्रोत आहे, म्हणून हे प्यायल्याने उर्जा प्राप्त होते. पित्त उसळल्यामुळे होणाऱ्या उलट्या किंवा अपचनामुळे होणारे जुलाब यांवर नारळ पाणी हा चांगला उपाय आहे. तसेच नारळपाणी पिल्यामुळे पोटातला दाह, आत पडलेले चट्टे असे त्रास कमी होतात.

लिंबू सरबत

आपण उन्हाळ्यात लिंबू सरबत या पर्यायाला आधी प्राधान्य देतो. लिंबू पाणी पिल्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो म्हणून उन्हात जाताना तहान लागल्यास लिंबू सरबत प्यावं. उन्हाळ्यात बऱ्याच व्यक्तींना चक्कर आल्यासारखं होतं, तेव्हा लिंबू पाणी प्यावं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तर लिंबू सरबत पितात, हे तर सगळ्यांना माहित असतं. पण तोंडाला येणारी दुर्गंधी ही या लिंबू पाण्याने नाहीशी होते.

कैरीचं पन्हं

उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा येतो आणि त्याआधी आंबटसर छान कैऱ्या येतात. या कैऱ्यांचं पन्हं उन्हाळ्यात करण्याची आपल्या महाराष्ट्रात प्रथा आहे. याचे खूप फायदे आहेत. शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी आहे. उष्माघात आणि पाण्याचं कमी होणारं प्रमाण याचा त्रास होऊ देत नाही. यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे क्षार, जीवनसत्व आणि पोटॅशियम असे घटक उपलब्ध असतात.

तर आता हेच उत्तम पर्याय आपण या उन्हाळ्यात वापरायला हवेत. कारण याचा परिणाम पचनक्रियेवर होतो म्हणून अशा पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील. उन्हाळ्यात पित्ताचे विकार जास्त जाणवू शकतात. अपचन, उलट्या, आम्लपित्त तसेच पाण्याची कमतरता भासणे असे त्रास होऊ शकतात. त्याच बरोबर बर्फ आपण खातो कारण तो थंड आहे आणि थंडावा निर्माण करेल अशी आपली समजूत असते, पण तसं नाही. बर्फ हा उष्णताकारक आहे. तो खाल्ल्याने उष्णता वाढते. त्यामुळे पन्हं, ताक, सरबत ही आरोग्यदायक पेयं प्या आणि स्वस्थ रहा.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ