मानवी शरीरात प्रमुख पाच इंद्रिये असतात. कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे ही ती पाच इंद्रिये होत. ही पाचही इंद्रिये फार महत्वाची आहेत. प्रत्येक इंद्रियांचे काम हे इतर इंद्रियांपेक्षा निराळे असते. कानाने आपण ऐकू शकतो, नाक श्वासोच्छ्वास घेण्यास मदत करते, जिभेमुळे चव आपण ओळखू शकतो, स्पर्शाची जाणीव होते ती त्वचेमुळे आणि डोळ्यांमुळे या रंगीत जगाचा अनुभव घेता येतो. आजच्या लेखात यातील डोळे या इंद्रियाबद्दल आपण बोलणार आहोत.
जसजशी आपली तंत्रज्ञानातील प्रगती होत गेली तसतशी या पंचेंद्रियांवर त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल असे परिणाम होत राहिले. याच तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील टीव्ही, संगणक आणि मोबाईल यांनी मानवी डोळ्यांवर परिणाम करण्यास सुरुवात केली. आपण इतिहासात दीड दोन शतक मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल, की भारतीय संस्कृतीत ‘चष्मा’ ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. १४व्या शतकात चष्म्याचा शोध लागला असला तरी त्याची आवश्यकता दुर्मिळ असायची. कारण डोळ्यांची पाहण्याची शक्ती अगदी सशक्त होती. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. वाढणाऱ्या संगणक आणि मोबाईलच्या वापरामुळे डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. हे टाळायला हवे. त्यासाठी आपण काही टीप या लेखत देणार आहोत.
अशाप्रकारे डोळ्यांची काळजी घ्या | Ways to Take Care of Your Eyes Everyday
चष्म्याचा वापर:
आज आपल्याला चष्मा लागला नसेल, तरी संगणक किंवा मोबाईलच्या सततच्या वापरामुळे तो लवकर लागण्याची शक्यता असते. हे टाळायचे असेल तर बाजारात उपलब्ध असणारे ‘स्क्रीन समोर बसताना वापरावयाचे चष्मे आपण बनवून घेऊ शकतात. बाजारात याचे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सर्व कंपन्यांच्या काचा आणि फायबर आपण यासाठी वापरू शकतो. आपण कोणत्या प्रकारच्या स्क्रीन समोर किती काळ बसणार आहोत यावरून आपण वरील काच किंवा फायबरची निवड करू शकतो. त्याचबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका.
रडणे चांगले आहे:
लहानपणी कधीतरी आपण काही तरी हवं म्हणून हट्टाला पेटल्यावर आणि तरीही घरच्यांनी ती वस्तू दिली नाही तर आपण रडून आकाशपाताळ एक करायचो. त्यावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी, ‘रडू देत डोळे चांगले राहतात’ असं म्हटल्याचं आपण ऐकलं असेल. त्यांच्या त्या सांगण्याचा वैज्ञानिक पुरावा आहे. डोळे जर फार काळ कोरडे राहिले तर डोळ्यातील बुब्बुळं कोरडी पडू शकतात. अधिक काळ स्क्रीन सामोरे राहिल्याने आपण आपली डोळ्यांची उघडझाप देखील नकळत कमी करतो. त्यामुळे हे संकट ओढवू शकते. त्यासाठी आज कृत्रिम अश्रू देखील वापरले जातात. या रडण्याने डोळ्यातील बुब्बुळं पुन्हा ओली होतात. सोबतच काम करत असताना डोळ्यात धूळ अथवा फार वारा जाणार नाही याची देखील काळजी आपण घ्यायला हवी.
थोडं थांबा:
अलीकडे नव्वद टक्के लोकांची कामं ही संगणक आणि लॅपटॉप यावर चालतं. कामाची वेळ ही साधारण ९ तास असते. त्यात एक तास जेवणासाठी सोडला तर सलग ८ तास आपण स्क्रीन समोर असतो. यामुळे डोळ्यांवर याचा प्रचंड ताण येत असतो. डोळ्यांना अधूनमधून आरामाची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या मतानुसार प्रत्येक २० मिनिटांनी आपण आपले डोळे स्क्रीन पासून दूर करायला हवेत. अर्धा मिनिट तरी आपण स्क्रीनकडे पाहायला नको. हे असं २०-२० मिनिटांनी थांबणे आपले डोळ्यांसाठी लाभदायक आहे.
सेटिंग बदल:
आपली कामं करण्याची जागा आणि संगणकाची स्क्रीन यात असायला हवे. स्क्रीन ही साधारण हातभार अंतरावर असायला हवी. शिवाय संगणक डोळ्यांच्या फार खाली अथवा फार वर नको. डोळ्यांच्या किंचित खाली असावी जेणेकरून डोळ्यांना काम करताना फार कष्ट घ्यावे लागणार नाही. आपण संगणकाच्या स्क्रीनचा उजेड देखील आवश्यक तेवढा ठेवायला हवा. फार वाढवल्याने त्यावरील चित्र उठून दिसतील मात्र ते डोळ्यांस अपायकारक ठरेल.
अशा प्रकारे आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेतलीत तर तुम्ही कामही करू शकाल आणि डोळ्यांना फार त्रासही होणार नाही.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.