‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांची संपूर्ण देशाला ओळख आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणाऱ्या राहीबाईंना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती असते. आज जो मानसन्मान, पुरस्कार राहीबाईंना मिळाला आहे त्यामागे आहे त्यांची अथक मेहनत आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द…. जेव्हा पहिल्यांदा मी राहीबाईंना पाहिलं तेव्हा केवढं आर्श्चय वाटलं. नऊवारी साडी नेसणारी, नाकात मोठ्ठी नथ, कपाळावर मोठं कुंकू लावलेली, एकदाही शाळेत न गेलेली म्हणजे अशिक्षित असंच म्हणायला हवं. अशा या साध्या भोळ्या घर-संसारात रमलेल्या राहीबाईंनी भावी पिढीच्या भविष्याचा विचार केला आहे आणि देशी वाणाची जपणूक सुरू केली. त्यांच्या बीज बँकेत विविध प्रकारची देशी वाणं आपल्याला आढळतील त्यातील कित्येकांची नाव देखील आपल्याला माहित नसतील.
‘राहीबाई पोपरे’ यांचा संघर्षमय प्रवास | Rahibai Soma Popere Success Story in Marathi
‘राहीबाई पोपरे’ ( Rahibai Soma Popere ) यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात झाला. आई-वडिलांना आठ अपत्य. त्यात राहीबाई पाचव्या होत्या. त्या आठ वर्षाच्या असताना आईचे निधन झाले आणि नऊ महिन्याच्या धाकट्या बहिणीचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. बहिणीचा सांभाळ करणे आणि वडिलांबरोबर शेतात मदत करणे हा त्यांचा दिनक्रम होता. त्यामुळे त्यांना शाळेत जाता आलं नाही. वयाच्या बाराव्या वर्षीच एका शेतकऱ्यांसोबत लग्न झाले.
नवऱ्याला शेतीच्या कामात मदत करून त्यांनी आपला संसार फुलविला. राहीबाईंची मुलं मोठी झाली आणि शेतीचं काम पाहू लागली. मुलांनी हायब्रीड वाणांचा, रासायनिक खतांचा वापर करून, उत्पन्न वाढवलं. घरात सगळं चांगलं सुरू असताना राहीबाईंचा नातू सारखा आजारी पडायचा. त्यामुळे त्या बैचेन झाल्या, आपण इतकी वर्षं जगतोय. आपण कधीच कोणत्याही आजाराला बळी पडलो नाही. मग हे आपल्या नातवंडांच्या बाबतीत का घडतं आहे? त्या सारख्या विचार करत होत्या. त्या अडाणी जरी असल्या तरी या प्रश्नाचं नेमकं उत्तर त्यांना सापडलं.
आपण जे खातोय, ते हायब्रीड आहे आणि ते किती खाल्लं तरी ताकत वाढणार नाही. त्यामुळेच, आपली नातवंडं आजारी पडत आहेत. परंतु, गावरान वाण खाल्ले, तर नक्कीच आजार पळून जाईल. तेव्हा त्यांनी हायब्रीड वाणाऐवजी गावरान वाणांची लागवड करायचं ठरवलं आणि त्या कामाला लागल्या. आता सुरूवातीला घराच्यांकडून विरोध झाला. मुलं म्हणाली, ‘हायब्रीडने उत्पन्न वाढतं.’ पण राहीबाई ठाम होत्या. आरोग्य महत्त्वाचं आहे, देशी पदार्थ आपली ताकद आहे हे त्या ओळखून होत्या. त्यांना शास्त्रीय ज्ञान भले नसेल पण लहानपणी वडिलांचे ‘जुने ते सोने’ हे विचार त्यांना भावले. त्यातूनच त्यांनी पुढे भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला.
वाटचाल सोपी नव्हती. आधी फक्त त्या घराकडे पहात होत्या. पण आता शेती आणि घर दोन्ही बघायचं होतं. राहीबाईंनी हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि त्या कामाला लागल्या. गावातील लोक, बचत गटातील बायका, शेजारीपाजारी त्यांना वेड्यात काढायचे. समाजात होणाऱ्या चेष्टेने त्या कधीच बेचैन झाल्या नाहीत. त्यात नगर जिल्हा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी, कोरडवाहू जमीन, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. मग असल्या भागात देशी वाणांची जपणूक करायची कशी? हे मोठं संकट त्यांच्यासमोर उभं होतं. त्यावरही त्यांनी मात केली. कधी बैलगाडीने, तर कधी डोक्यावरून पाणी आणून वाणं जगविली. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे… अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. वीस वर्षांपासून राहीबाई बीज संवर्धनाचं काम करत आहेत. 250 हून अधिक वाणांची जपणूक त्यांनी केली आहे. त्या बियाणांची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. कोणतं बियाणं कुठे ठेवलं आहे ते सुद्धा त्या अचूक सांगतात. एवढ्या त्या देशी वाणासोबत एकरूप आहेत. आपल्या मुलांप्रमाणे त्या बीजांना जपतात म्हणून त्या बीजमाता आहेत.
बायफ संस्थेच्या मदतीने कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून त्यामार्फत राज्य आणि देश पातळीवरील बीजसंवर्धनाचे कार्य राहीबाई करतात. त्यांनी आपलं जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित केलेले आहे. आज राहीबाईंच्या कामाचा विस्तार वाढलेला असून त्या एक बीज बँकर, गावरान वाणांची माता, बीज माता, सीडमदर बनलेल्या आहेत. ज्या वयात नातवंडाबरोबर बसून खेळायचं, त्याच वयात केवळ आपल्या नातवंडांसाठीच नव्हे, तर साऱ्या जगाच्या भविष्याची तरतूद करत आहेत. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, आपला निर्धार सोडला नाही. मी शिकलेली नाही, लिहीता वाचता येत नाही, मी काय करू, कोणाचा पाठिंबा नाही असं म्हणत रडत बसल्या असत्या तर अनेक देशी वाणं आज लुप्त झाली असती. पण राहीबाई हरल्या नाहीत.
कुटुंबिय, नातेवाईक, शेजारी, गावातले लोक कुचेष्टेने बोलायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही. एका ठिकाणी राहीबाईंनी सांगितलं होतं, ‘घरी दळण नीट झालं नाही तर भाकर मिळणार नाही,’ असं सासूबाई सांगायच्या. म्हणजे घरच्यांचा धाक होता पण त्याबरोबर आपल्याला काही करायचं आहे हेसुद्धा मनात होतं आणि त्यानुसार त्यांनी वाटचाल केली. सरकारकडून त्यांच्या देशीवाणाच्या साठवणूकीसाठी त्यांना जागा देण्यात आली आहे. देशी वाणाच्या संवर्धनासाठी आज त्या देशविदेशात फिरल्या आहेत. भले समोरच्याची भाषा आपल्याला कळत नाही पण आपण काय करतोय हे आपल्याला चांगलं कळतं. आपल्या विचारांचं वाण दर्जेदार असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर पेरलेलं उगवणारच अर्थात मेहनतीची तयारी हवी. तरच आपण आपलं ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतो हेच राहीबाईंच्या प्रवासातून सिद्ध होतं.
Note: जर तुमच्याकडे Biography of Rahibai Soma Popere in marathi मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Rahibai Soma Popere information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.