सर्व फळांचा राजा ‘आंबा’ गोड, मधुर व परिपक्व असा ‘आंबा’ खाल्ल्यावर मन तृप्त होतं. भारतामध्ये आंब्याचं उत्पादन जास्त प्रमाणात होते. गुजरातमधील ‘केशर’, ‘बलसाडी’ तर महाराष्ट्रात हापूस, पायरी, तोतापूरी आणि उत्तर भारतात बनारसी, किशनभोग, लंगडा, तर दक्षिण भारतातील केसरीया, शेवप्पा ह्या आंब्याच्या काही जाती अतिशय प्रसिद्ध आहेत. काही जण आंब्याच्या फोडी कापून खातात तर काही जण आंबे चोखून खातात. आंब्यापासून स्वादिष्ट पेये, आमरस, सॉस, करी आदी चविष्ट प्रकार बनवले जातात.
आंबा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Mango benefits in marathi
- आंब्याचे मूळ रूप कैरी. कैरी पिकल्यावर आंबा तयार होतो. कैरीचा प्रामुख्याने उपयोग लोणचे, मोरंबा यामध्ये होतो. कैरीचे पन्हेही बनवले जाते. लहान कच्ची कैरी आंबट, तुरट, वायूकारक व पित्तकारक असते. मोठी कच्ची कैरी त्रिदोषकारक असते. कच्च्या कैरीपासून बनवलेला मुरांबा चविष्ट व पौष्टिक असतो तसेच तो तोंडाला रुची आणतो व पित्तही नाहीसे करतो. परंतु कच्च्या कैरीमुळे मंदाग्नी, मलावरोध, रक्ताचे व पोटाचे विकारही होऊ शकतात.
- पिकलेल्या गोड आंब्यामध्ये ‘ए’ व ‘सी’ जीवनसत्त्व असते. जंतुनाशक व त्वचारोगहारक असाही त्याचा उपयोग होऊ शकतो. पिकलेला आंबा पचायला थोडा जड, थंड, पित्तकारक व थोडासा कफवर्धक असतो. शरीरात रसधातू निर्माण करणारा आंबा अस्थी, मेद, मज्जा, शुक्र आदी धातूंची वृद्धी करतो. पचनसंस्थेचे रोग, फुप्फुसाचे रोग, आमाशयाचे रोग, रक्ताची कमतरता यावर आंब्याचा औषध म्हणून उपयोग होतो.
- पिकलेला आंबा बलवर्धक, पोट स्वच्छ ठेवणारा, चरबी वाढवणारा असून मृदू रेचकही असल्याने शौचास साफ होते. आमरसाच्या सेवनाने अरुची, आम्लपित्त, आतड्यांचे रोग, यकृतासंबंधीच्या विकारांमध्येही फायदा होतो.
- आंब्याच्या सेवन केल्याने मेदाचे प्रमाण वाढते तसेच दुधाबरोबर सेवन केल्याने वीर्यवृद्धी होते.
- आंब्याच्या कोयीमधून निघालेले तेल संधिवातावर उपयोगी ठरते.
- दुर्बल व कमजोर प्रकृती असलेल्यांनी प्रथम गाईचे दूध पिऊन त्यावर रसदार गोड आंबा चोखून खावा. अशा प्रकारे दीड-दोन महिने दररोज दूध व आंब्याचे सेवन केले असता पचनक्रिया सुधारून भूक लागते. मलावरोध दूर होतो. वीर्यदौर्बल्य, रक्तदोष दूर होतो.
- आंब्याची कोय दह्यात वाटून दिल्याने आमातिसार दूर होतो तसेच ताकात वाटून दिल्याने रक्तातिसार दूर होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.