या क्षेत्राची महत्ता खूप मोठी आहे. शक्तिस्वरूपा पार्वतीमातेने आपणास गजानन हाच पुत्र व्हावा, अशी कामना धरून या लेण्याद्री पर्वताच्या गुहेत 12 वर्षे कठोर तप केले. पार्वतीची उग्र तपश्चर्या पाहून गजानन प्रसन्न झाले. त्याने पार्वतीमातेला वर दिला. पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची येथे स्थापना करून पूजा केली.
मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे गजानन बटुरूपात प्रकट झाला. या गजाननाला सहा हात, तीन नेत्र होते. त्याचे सुंदर शरीर होते. येथे गणेशाला गौतम ऋषींचा सहवास घडला. गणेशाने या क्षेत्रात सतत पंधरा वर्षे वास्तव्य केले. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.येथील विनायक प्रत्यक्ष गिरिजेचा म्हणजे पार्वतीमातेचा आत्मज / पुत्र असल्यामुळे त्याला या ठिकाणी ‘गिरिजात्मज’ असे संबोधले जाऊ लागले.
श्री विनायक गिरिजात्मज मंदिर | lenyadri girijatmaj ganpati temple information in marathi
हे मंदिर उंच डोंगरावर असून लेणी-स्वरूपात आहे. पायथ्यापासून सुमारे 283 पायऱ्या चढून वर पोहोचले, की समोर ‘गिरिजात्मज मंदिर’ दिसते. हे मंदिर दक्षिणाभिमुख असून मंदिर संपूर्णपणे दगडात कोरलेले दिसून येते. मंदिराच्या सभोवती अनेक लेणी आहेत. हे मंदिर सातव्या लेणीत असून, त्यास ‘गणेश लेणी’ म्हणतात.
मुख्य मंदिरासमोर रेखीव, भव्य असा सभामंडप आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना अनेक ओवऱ्या आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस कोरीव खांब आहेत. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.
श्री विनायक गिरिजात्मज मूर्ती
गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली असून ती उत्तराभिमुख आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीच्या नाभीत आणि भालावर अस्सल हिरे बसविलेले आहेत. मूर्तीच्या मागचा भाग लांबलचक आणि मोठ्या डोंगराने व्यापला असल्याने आपणास प्रदक्षिणा घालता येत नाही. येथील मूर्तीला इतर कोणतेही अलंकार नाहीत.
या तीर्थक्षेत्राची विशेषता
1) लेण्याद्री हे तीर्थस्थान लोकवस्तीपासून दूर अंतरावर असल्यामुळे हे ठिकाण ध्यान-धारणेस योग्य असे आहे.
2) मंदिरातील पूजा विश्वस्तांतर्फे आणि स्वहस्ते करता येते.
3) या पर्वतावर अनेक बौद्ध लेण्या आहेत.
4) नोव्हेंबर ते मे पर्यंतचा काळ यात्रेसाठी अनुकूल समजला जातो.
5) हा लेणी परिसर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरातत्त्व खात्यातर्फे नाममात्र शुल्क आकारले जाते.
6) ‘लेण्याद्री’ हे या ठिकाणाचे नाव असून ते गोळेगावच्या हद्दीत येते.
येथील उत्सव
या ठिकाणी भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थीला मोठे उत्सव साजरे होतात. महापूजा, सहस्रावर्तन, कीर्तन असेही कार्यक्रम येथे होतात.
जवळची प्रेक्षणीय स्थळे
1) शिवनेरी किल्ला : श्री छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ
2) ओतूर : पुरातन असे कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराज यांचे गुरू चैतन्यस्वामी महाराज यांची संजीवन समाधी
3) कुकडेश्वर : कुकडी नदीच्या उगमाजवळ कुकडेश्वर मंदिर
4) माळशेज घाट : अभयारण्य आणि थंड हवेचे ठिकाण
5) नाणेघाट : प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट
6) कुकडी नदी : कुकडी नदी या स्थानापासून सुमारे तीन कि. मी. अंतरावरून वाहते.
येथील निवास व भोजन-व्यवस्था
या ठिकाणी देवस्थानतर्फे भोजनाची आणि निवासाची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे.
हे सुध्दा वाचा:- थेऊर – श्री चिंतामणी गणपती मंदिराबद्दल माहिती
अंतर किती आहे?
1) पुणे – नारायणगाव – जुन्नर – लेण्याद्री – 102 कि. मी.
2) जुन्नर – लेण्याद्री – 7 कि. मी.
3) मुंबई – कल्याण – माळशेज घाट – मढ – लेण्याद्री – 180 कि. मी.
4) अहमदनगर – आळेफाटा – ओतूर – लेण्याद्री – 100 कि. मी..
लेण्याद्रीला कसे जाल ?
1) पुणे – नारायणगाव – जुन्नर – लेण्याद्री असे एस. टी. बसने जाता येते. पुणे येथील शिवाजीनगर एस. टी. बसस्थानकातून लेण्याद्री येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
2) स्वतःच्या खाजगी वाहनाने आपण येथे जाऊ शकता.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.