आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस. तमाम मराठी जनतेसाठी गौरवाचा, उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस. यासोबतच आज ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिवस’ पण आहे. पण हा कामगार दिन आजच का असतो? याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? भारतात आजच्या दिवशी कामगार दिवस साजरा होतो. मग हा आंतराष्ट्रीय दिवस जगात आणखी कुठल्या कुठल्या देशात साजरा होतो आणि कोणत्या देशात हा दिवस साजरा होत नाही, या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या पोस्टमध्ये.
काय आहे कामगार दिनाचा इतिहास ? | International workers’ day history in marathi
युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि तिथला कायापालट झाला. पण त्याचबरोबर कामगार वर्गाची पिळवणूक होऊ लागली. एक तर जितकं काम त्या प्रमाणात पगार मिळत नसे. दिवसाला 14-15 तास काम करावे लागे. केवळ युरोपातच नव्हे तर अमेरिका खंडातही हीच परिस्थिती होती.अमेरिकेत 1 मे 1886 रोजी कामाचे आठच तास करावेत या मागणीसाठी जवळपास साडेतीन लाख कामगारांनी त्या दिवशी कामावर न जाता संप केला.
शिकागोमध्ये 40 हजार कामगार संपावर होते. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी भांडवलदार सुद्धा सज्ज झाले होते. या संपात भाग घेतलेल्या कामगारांना कारखान्यात प्रवेश मिळू नये म्हणून पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. संपाच्या तिसऱ्या दिवशी मात्र काही आंदोलक आंदोलन चिरडू पाहणाऱ्या लोकांशी थेट भिडले. परिणामी त्या कामगारांवर गोळीबार झाला. याचे तीव्र पडसाद उमटले आणि कामगारांनी दुसऱ्या दिवशी हेमार्केट (Haymarket) चौकात रॅली काढली. उपस्थितांनी मोर्चा काढला आणि भाषणे झाली. दिवसाच्या अखेरीस, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस तिथे आले आणि ते जमावापर्यंत पोहोचण्यापूर्वीच एका आंदोलकाने पोलिसांच्या दिशेने बॉम्ब फेकला.अधिकाऱ्यांनी त्वरीत गोळीबार करण्यास सुरुवात केली, चेंगराचेंगरी आणि गोंधळ निर्माण झाला ज्यामुळे सहा अधिकारी मरण पावले आणि साठ जखमी झाले. दोन आंदोलक मृत्यूमुखी पडले. ही अधिकृत आकडेवारी असली तरी प्रत्यक्षात मृत्यमुखी पडलेले आणि जखमी झालेल्यांची संख्या अधिकच असेल. परंतु खरी आकडेवारी कधीही जाहीर झाली नाही.
हेमार्केट (Haymarket) मध्ये झालेल्या या धुमश्चक्री नंतर कामगांराच्या मागण्यांवर विचर होऊ लागला. परिणामी कामाचे तास कमी करणं गरोदर कामगार स्त्रियांना भरपगारी रजा देणं अशा सुविधा मिळू लागल्या. 1 मे च्या या लढ्याने कामगारांचा लढा यशस्वी झाला. 14 जुलै 1889 ला पॅरीसमध्ये युरोपातील समाजवादी पक्षांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसने 1 मे हा कामगार दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारत आणि कामगार दिन
भारतात कामगार दिनाचा पहिला औपचारिक उत्सव भारताच्या मजूर किसान पक्षाने 1 मे 1923 रोजी चेन्नई म्हणजे तत्कालीन मद्रास येथे सुरू केला. याच वेळेस कामगार चळवळीचे प्रतिक असणारा लाल ध्वज ही भारतात पहिल्यांदाच वापरला गेला. आसाम, बिहार, गोवा, महाराष्ट्र,झारखंड, कर्नाटक, केरळ, मणिपूर, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या दिवसाच्या निमित्ताने सुट्टी दिली जाते.
1 मे हा कामगार दिवस असला तरीही भारताचा असा एक कामगार दिवस आहे. तो म्हणजे 10 जून. जशी युरोप, अमेरिकेत 19 व्या शतकात कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ उभी राहिली तशीच आपल्याकडेही उभी राहिली. पण आपल्याकडच्या काय मागण्या होत्या? त्यावेळी आपल्याकडे सुद्धा कामगार 12-12 तास काम करायचे. हे कामाचे तास कमी करावेत, आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी, जेवणासाठी निदान अर्धा तास सुट्टी मिळावी, कामगारांचा पगार वेळेवर व्हावा.
अपघातग्रस्त कामगाराला नुकसानभरपाई व भर पगारी रजा मिळावी, गरोदर कामगार महिलांना भर पगारी रजा मिळावी ह्या कामगारांच्या मागण्या होत्या. हे कामगार आंदोलन 1884 ते 1890 गिरणी मालक, ब्रिटिश सत्ता आणि भांडवलदार यांच्या विरोधात चालू होतं. या चळवळीचं नेतृत्व करत होती एक मराठी व्यक्ती ‘नारायण मेघाजी लोखंडे. त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी मुंबईमध्ये सात वर्षे जोरदार लढा दिला. आणि अखेर 10 जून 1890 रोजी त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या. तोवर असंघटित असणाऱ्या कामगारांची त्यांनी “बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन” ही पहिली कामगार संघटना सुरू केली. आज आपण ज्या रविवारच्या सुट्टीची वाट पाहतो ती मिळवून देण्याचं श्रेय ही या लोखंडे यांनाच जातं.
अमेरीका साजरा करत नाही हा कामगार दिवस?
जागतिक कामगार दिन जगभरात बऱ्याच देशांमध्ये साजरा केला जातो. हा श्रमिक दिवस असल्याने साहजिकच मार्क्सवादी आणि समाजवादी संघटना त्या जगभर साजरा करतात. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेतील संघटित कामगारांमध्ये हा दिवस लोकप्रिय झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर, शीतयुद्धाच्या राजकारणाने अमेरिकी सरकारला संघटित कामगारांच्या शक्तीवर मर्यादा घालण्यास प्रवृत्त केले आणि कडक कायद्यांमुळे कामगार संघटनांनी राजकीय मोहिमांमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंधित केले. पण पुढे यांवर उपाय म्हणून सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी कामगार दिन साजरा होऊ लागला. आणि अमेरिका, कॅनडा सारखे देश हाच कामगार दिन साजरा करतात. ऑस्ट्रेलियात आठ तास कामासाठी चळवळ उभी राहिली आणि मोठ्या लढ्यानंतर 21 एप्रिल 1856 मध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. म्हणून तिकडे 21 एप्रिल हा कामगार दिन आहे.
आपण भारतात 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो. ह्या खास दिवसाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा! ही कामगार दिनाबद्दलची खास माहिती तुम्हाला आवडली का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.