‘फळे’ खरेदी संबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Tips Regarding Buying Fruits in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आपण फळे खरेदी संबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर राहणार आहेत. फळे खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया.

फळे खरेदी संबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Tips Regarding Buying Fruits in Marathi

मोसंबी

पातळ व तुकतुकीत सालीची मोसंबी घ्यावीत. रस चांगला निघतो.. जाड सालीच्या मोसंबीत रस कमी निघतो व सुकी सुकी असतात. पातळ सालीची मोसंबी हाताला गुळगुळीत लागतात व जाड सालीची मोसंबी हाताला खरखरीत लागतात.

संत्री

हाताला घट्ट लागणारी संत्री घ्यावीत. हाताला मऊ लागणारी व पोकळ संत्री घेऊ नयेत. खूप वेळा ती आतून जास्त तयार झालेली व खराब असतात. ती लवकर सडतात.

सफरचंद

सफरचंदाच्या अनेक जाती आहेत. लाल रंगाची टवटवीत व पातळ सालीची सफरचंदे चांगली असतात. तसेच पिवळसर रंगाची टवटवीत दिसणारी गोल्डन ॲपलही चवीला खूप छान असतात. अलुबूखारसारखी दिसणारी छोटी व गुलाबी रंगाची संफरचंदेही चवीला चांगली असतात. सफरचंदाचे साल सुरकुतल्यासारखे व सुकल्यासारखे असेल तर त्या सफरचंदांना चव लागत नाही व खाताना ती मऊ लागतात. जाड सालीची आतून पिठूळ असणारी सफरचंदे खायला चांगली लागत नाहीत पण ज्यूस व शेकसाठी ती सफरचंदे चांगली.

चिकू

आकाराने लांबट, उभट व रंगाने फिकट पिवळे किंवा किंचित गुलाबी चिकू गोड असतात. हा चिकू आतून फिकट गुलाबी रंगाचा असतो. मातकट रंगाचा, सुरकुतलेला व निस्तेज चिकू घेऊ नये. हा चिकू शिळा व जास्त तयार झालेला असतो व आतून काळसर रंगाचा आणि आंबूस चवीचा असतो.

केळी

केळ्यांच्या अनेक जाती असतात. हिरव्या सालीची केळी किंचित पिवळसर हिरव्या व रसरशीत दिसणारी घ्यावी. ही केळी डागाळलेली असल्यास जास्त तयार झालेली असतात. ती चवीला पचपचीत लागतात व लवकर खराब होतात.. बोटाएवढी लांब असणारी व पिवळ्या सालीची वेलची केळी चवीला एकदम गोड असतात. वेलची केळ्यांसारखी दिसणारी पण जाड असणारी पिवळ्या सालीची बटर केळी चवीला आंबट-गोड असतात. आकाराने खूप मोठी असणारी व पिवळ्या सालीची राजेळी केळी ही चवीला चांगली असतात व लवकर खराब होत नाहीत.

सिताफळ

मोठ्या डोळ्यांची व हिरवीगार सिताफळं घ्यावीत. मोठ्या डोळ्यांच्या सिताफळांत बिया कमी असतात व गर जास्त असतो. बारीक डोळ्यांच्या सिताफळात बिया जास्त असतात व गर कमी निघतो. सिताफळाचे डोळे जास्त काळवंडलेले व जास्त उकललेले असल्यास ती सिताफळे शिळी व जास्त तयार झालेली असतात. देठाकडे काळी व बारीक तसेच किंचित काळ्या डोळ्यांची कच्ची सिताफळे न पिकताच दडदडीत राहतात व खराब होतात.

द्राक्षे

द्राक्षे दोन जातीची असतात. हिरवी द्राक्षे व काळी द्राक्षे. हिरवी द्राक्षे- रसरशीत दिसणारी पिवळसर हिरव्या रंगाची व लांबट आकाराची द्राक्षे चवीला एकदम गोड असतात. तर हिरवीगार दिसणारी द्राक्षे कच्ची वचवीला आंबट असतात. द्राक्षे तांबूस पिवळ्या रंगाची व डागाळलेली असल्यास व देठ काळे सुकल्यासारखे असल्यास ती द्राक्षे शिळी व जास्त तयार झालेली असतात व ती लवकर खराब होतात. काळी द्राक्षे काळ्याभोर रंगाची, टवटवीत दिसणारी व तांबूस घट्ट देठांची द्राक्षे ताजी व चांगली असतात. द्राक्षाचा घड उचलल्यावर द्राक्षे गळू लागली व 2-4 द्राक्षे सुकलेली असल्यास द्राक्षे शिळी समजावीत.

अलुबुखार

काळसर लाल रंगाची, रसरशीत व घट्ट अलुबुखार चवीला गोड असतात. गुलाबीलाल रंगाचे अलुबुखार चवीला आंबट असतात. सुरकुतलेले व मऊ अलुबुखार जास्त तयार झालेले असतात.

पिच

पिवळसर व किंचित तांबूस व रसरशीत पिच चांगली असतात.

अंजीर

रसरशीत व पिवळसर हिरव्या रंगाचे अंजीर चवीला चांगले असतात. आतून गुलाबी रंगाचा अंजीर चवीला गोड असतो.

स्ट्रॉबेरी

काळसर लाल रंगाची, टवटवीत व घट्ट स्ट्रॉबेरी घ्यावीत. स्ट्रॉबेरी थोडी जरी मऊ असली तरी लगेचच खराब होतात.

अननस

पिवळसर तांबूस रंगाचा व घट्ट डोळ्यांचा सुरेख वास येणारा अननस चवीला चांगला असतो. अननसाचा डोळा दाबल्यावर आत जाणारा अननस जास्त तयार झालेला असतो व आंबूस वासाचा असतो.

डाळिंब

डाळिंब तीन जातीची असतात. गुलाबी दाण्याची, काळपट लाल दाण्याची व पांढऱ्या दाण्याची. ही डाळिंब ताजी, रसाळ, डाग नसलेले दाणे असल्यास चवीला चांगली असतात. डाळिंब घेताना डाळिंबाचे साल देठाकडून थोडे काढून दाणे बघून घ्यावे. डागाळलेले दाणे असल्यास ती चवीला शिळी व आतून खराब असतात.

पपई

हिरवट पिवळसर रंगाचा लांबट गोल आकाराचा मध्यम व रसरशीत पपई चांगला असतो.आतून पिवळसर लाल रंगाचा पपई गोड असतो. बाहेरून काळसर डागाळलेला व दबलेला पपई जास्त पिकलेला असतो. तो चवीला चांगला लागत नाही व लवकर खराब होतो.

कलिंगड

आतून लालगुलाबी व खसखशीत कलिंगड चवीला गोड व चांगले असते. आतून पांढरट पडलेले पचपचीत लागते व आतून काळपट मऊ पडलेले आंबूस व खराब असते. कलिंगड घेताना कलिंगडाला चीर पाडून आतला रंग बघूनच घ्यावे.

आंबे

आंब्यांच्या अनेक जाती असतात. पिवळ्या रंगाचे, रसरशीत दिसणारे व घट्ट आंबे चांगले असतात. आंबा हाताला मऊ लागला तर जास्त तयार झालेला व खराब असतो. तसेच सुरकुतलेल्या सालीचे आंबे जास्त पिकलेले व पचपचीत लागतात. अर्धवट पिकालेले आंबे जास्त चवदार असतात व त्यांना एकप्रकारचा सुगंध येतो.

फणस

पिवळ्या रंगाचे, जाड सालीचे व घट्ट कापे गरे चवीला छान व खसखशीत लागतात.फणस जास्त पिकलेला असल्यास गरे मऊ व आंबूस लागतात. अर्धवट पिकलेले बरके गरेही चांगले लागतात; पण हे गरे रसाळ असल्यामुळे गिळताना त्रास होतो. बरक्या फणसाचे गरे फणसपोळीसाठी वापरतात.

जांभळे

काळीभोर, मोठी व रसरशीत घट्ट जांभळे चवीला गोड असतात. बारीक जांभळे चवीला बऱ्याचवेळा तुरट असतात.

बोरे

पिवळसर तांबूस रंगाची, रसरशीत, घट्ट अहमदाबादी बोरे चवीला चांगली असतात. डागाळलेली व सुरकुतलेली मऊ बोरे शिळी व खराब लागतात.

पेरू

पिवळसर रंगाचा, रसरशीत व घट्ट पेरू चवीला गोड असतो. डागाळलेला व किंचित मऊ पेरू जास्त झालेला व आतून खराब असतो.

जाम

पांढरे, घट्ट व रसरशीत जाम चांगले असतात.

पेर

हिरवट पिवळसर रंगाचे उभट आकाराचे ताजे टवटवीत बघून घ्यावीत. डागाळलेली घेऊ नयेत.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button