नमस्कार मित्रांनो, आज आपण भाज्या खरेदी संबंधी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी ही माहिती खूप फायदेशीर राहणार आहेत. भाजी खरेदी करताना कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ह्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या भाज्या बद्दल.
भाज्या खरेदी संबंधी महत्त्वाच्या टिप्स | Important Tips for Buying Vegetables
कांदे
कांदे दोन प्रकारचे असतात. पांढरे कांदे व लाल कांदे. पांढरे कांदे कमी तिखट असतात, तेव्हा ते खाण्यासाठी वापरतात. लाल कांदे स्वयंपाकात वापरतात. कांद्याचा शेंडा टोकदार व साल घट्ट व तुकतुकीत असल्यास आणि वजनाला जड असल्यास चांगला असतो. कांदा शेंड्याला मऊ असल्यास आतून खराब असतो.. तसेच ओले कांदे लवकर कुजतात, चिरताना जास्त झोंबतो व बुळबुळीत असतो.
टीप- कांदे, बटाटे, लसूण कपाटात न ठेवता मोकळ्यावर जाळीच्या परडीत ठेवल्यास खूप दिवस चांगले राहतात.
बटाटे
डोळे खोल गेलेले, हिरवट रंगाचे व कोंब फुटलेले बटाटे घेऊ नयेत. जुने व पक्के, जड व किंचित लालसर रंगाचे गुळगुळीत बटाटे घ्यावेत. नवीन बटाटे लवकर कुजतात व ते चिकट असतात. त्याची साले थोडी थोडी निघालेली असतात.
आले
आले घट्ट, पांढरे, जड व रेषा नसलेले घ्यावे. सुकलेले आले घेऊ नये.
लसूण
लसणीच्या पाकळ्या घट्ट व टवटवीत असलेली लसूण घ्यावी. लसणीच्या पाकळ्या दबलेल्या व मऊ असल्यास लसूण आतून पिवळी पडलेली व मेलेली असते.
मिरच्या
मिरच्या हिरव्यागार व टवटवीत बघून घ्याव्यात.
- लवंगी मिरच्या काळपट हिरव्या रंगाच्या व बुटक्या असतात. त्या फार तिखट असतात.
- काळपट हिरव्या रंगाच्या व लांब मिरच्या बेताच्या तिखट असतात. रोजच्या स्वयंपाकात घालण्यासाठी त्या मिरच्या चांगल्या.
- पोपटी रंगाच्या व लांब मिरच्या कमी तिखट असतात म्हणून त्या मिरच्या लोणच्यासाठी वापराव्यात म्हणजे मिरची चावली तरी उसका लागण्याची भीती नसते.
- बुटक्या व जाड मिरच्या भरून वाळवण्यासाठी वापराव्यात.
टीप- मिरच्यांचे देठ काढून वाळल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवाव्यात म्हणजे खूप दिवस टिकतात. मिरच्या डब्यात भरण्याआधी तळाला पेपर घालावा.
लिंबे
लिंबू पातळ सालीचे, पिवळे रसरशीत व तुकतुकीत बघून घ्यावे. सुकलेले व डागाळलेले लिंबू घेऊ नये. सुक्या लिंबाचा रस कडू असतो.
काकडी
काकड्या बेताच्या आकाराच्या, रसरशीत व पांढरट रंगाच्या बघून घ्याव्यात. पिवळसर रंगाच्या व खूप जाड्या काकड्या जून असतात. काकडी चिरताना टोकाचा तुकडा खाऊन पाहावा. तुकडा कडू असल्यास पूर्ण काकडी कडू असते.
टोमॅटो
टोमॅटो घेताना रसरशीत, लाल गुलाबी रंगाचे, कडक व गोलसर आकाराचे घ्यावेत. हाताला मऊ लागणारे व बोटचेपे टोमॅटो घेऊ नयेत, ते लवकर खराब होतात.
गाजरे
गाजरे घेताना ताजी रसरशीत व लाल गुलाबी रंगाची बघून घ्यावीत, ती गाजरे गोड असतात. शेंदरी रंगाची गाजरे किंचित उग्र असतात. गाजर कुठेही बोटचेपे घेऊ नये, ते आतून कुजलेले असते.
बीट
बीट घेताना ताजे, घट्ट व काळपट रंगाचे घ्यावे.
कोबी
कोबी पांढरट हिरव्या रंगाचा, घट्ट व रसरशीत बघून घ्यावा. कोबी घेताना बाहेरून भोक नसलेला बघून घ्यावा. भोक असलेला कोबी आतून किडका असतो. तसेच कोबी घेताना देठाकडे पाहून घ्यावा. खूप वेळा देठाकडे किडका असतो. पांढरा कोबी चवीला कमी व उग्र असतो.
फ्लॉवर
फ्लॉवर घेताना घट्ट, पांढराशुभ्र, जड व टवटवीत बघून घ्यावा. फ्लॉवरचा तुरा पिवळसर व सैल असल्यास आत किडी असतात. फ्लॉवर घेताना तुरे बाजूला करून व देठाकडून पाहावा. किडका असल्यास किडी दिसतात.
वांगी
वांगी अनेक प्रकारची येतात. वांगी घेताना ताजी, रसरशीत, घट्ट व बाहेरून भोक नसलेली बघून घ्यावीत. भोक असलेले वांगे आतून किडके असते. काटेरी व पांढरी वांगी भाजीसाठी वापरावीत.छोटी वांगी भरलेली वांगी करण्यासाठी वापरावीत. लांब व जाडे वांगे भरीत करण्यासाठी भाजायला वापरावे.
सिमला मिरची
सिमला मिरची घेताना हिरवीगार, टवटवीत, घट्ट व वरून भोक नसलेली घ्यावी. भोक असल्यास आतून किडकी असते.
लाल भोपळा
लाल भोपळा पिवळसर रंगाचा व लाल रंगाचा असतो. लाल रंगाचा भोपळा घ्यावा.
दुधी भोपळा
दुधी भोपळा हिरवा, लांब, बेताचा जाड व टवटवीत बघून घ्यावा. खूप जाड असल्यास जून व कापसासारखा असतो.
सुरण
सुरण आतून लाल व पिवळ्या रंगाचा असतो. पिवळसर रंगाचा सुरण घ्यावा. लाल रंगाच्या सुरणाला जास्त खाज असते.
रताळी
रताळी जाड व रसरशीत बघून घ्यावीत.बारीक व वाकड्यातिकड्या आकाराची रताळी आतून हिरवट व खराब असतात.
कारली
कारली घेताना ताजी, टवटवीत व पोपटी रंगाची जून बघून घ्यावीत. ती कारली कमी कडू असतात. हिरवीगार कोवळी कारली जास्त कडू असतात.
भेंडी
भेंडी घेताना ताजी, टवटवीत व कोवळी बघून घ्यावीत. कोवळ्या भेंडीचा शेंडा हाताने पटकन तुटतो. शेंडा न तुटता वाकल्यास भेंडी जून असतात. घेऊ नयेत. पांढरी व लांब भेंडीही चवीला चांगली असतात.
पडवळ
पडवळ घेताना सरळ, लांब, ताजे व गुबगुबीत बघून घ्यावे. वाकडेतिकडे पडवळ आतून किडके असते. हाताला खूप कडक लागणारे पडवळ जून असते.
दोडकी (शिराळी)
दोडकी घेताना हिरवीगार, सरळ, घट्ट व टवटवीत बघून घ्यावीत. वाकडीतिकडी दोडकी आतून किडकी असतात. हाताला मऊ लागणारी दोडकी आतून कुजलेली असतात. दोडकं चिरताना चकती खाऊन पाहावी. कडू असल्यास पूर्ण दोडके कडू असते.
तोंडली
तोंडली घेताना हिरवीगार, टवटवीत व लहान बघून घ्यावीत. खूप जाड व पिवळी तोंडली जून व आतून लाल पिकलेली असतात.
परवर
टवटवीत व हिरवी बघून घ्यावीत.
फरसबी
फरसबी हिरवीगार, कोवळी व बारीक बघून घ्यावी. जाडी फरसबी जून असते व जाड दोर असतो.
श्रावणघेवडा
श्रावणघेवडा हिरवागार, ताजा व डाग नसलेला बघून घ्यावा.
गवार
गवार घेताना हिरवीगार, ताजी, रसरशीत कोवळी व बेताची जाड बघून घ्यावी. कोवळी गवारीची शेंग हाताने वाकवल्यास पटकन तुटते. खूप जाड शेंगा असतात.
वालीच्या शेंगा (चवळी)
वालीच्या शेंगा हिरव्यागार, कोवळ्या व टवटवीत बघून घ्याव्यात. कोवळी शेंग हाताने मोडल्यास पटकन तुटते.
ओला वाटाणा (मटार शेंगा)
मटार घेताना हिरवागार व गच्च दाणे भरलेल्या शेंगा असल्यास घ्याव्यात. चपट्या शेंगा असलेला मटार आतून पोकळ व दाणे बारीक असतात. पांढऱ्या व सुकत आलेल्या शेगेमध्ये पिवळसर व जून दाणे असतात. ते मटार मऊ शिजत नाही व त्याला चवही नसते.
भुईमुगाच्या शेंगा
भुईमुगाच्या शेंगा घेताना गुलाबी रंगाचे दाणे असलेले बघून घ्याव्यात. गुलाबी दाणे गोड असतात व मऊ शिजतात. जांभळ्या रंगाचे दाणे असलेल्या शेंगा जून असतात व दाणे मऊ शिजत नाहीत.
शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगा घेताना हिरव्यागार, ताज्या, बेताच्या जाड बघून घ्याव्यात. खूप जाड शेंगा जून असतात व त्याला आतून कडक बी धरलेली असते. त्या चवीला तुरट लागतात. खूप बारीक शेगेत व सुकलेल्या शेंगेत आतला गर खायला मिळत नाही.
मक्याची कणसे
मक्याची कणसे घेताना गच्च भरलेल्या पांढऱ्या दाण्याची कोवळी बघून घ्यावीत. दाणा नखाने दाबल्यावर दूध बाहेर आल्यास कणसे गोड व कोवळी असतात. ती मऊ शिजतात. पिवळ्या दाण्याची कणसे जून असतात व शिजत नाहीत. अगदी बारीक दाणे असले तरीही कणसात खायला काही मिळत नाही.
टीप- मक्याची कणसे खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास दाणे सुकतात. ताजी ताजी लगेचच खावीत.