आपल्या कालगणनेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तो म्हणजे गुढी पाडवा, आपण हा सण उत्साहात साजरा करतो. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. इथं सण सुद्धा विविधतेने साजरे केले जातात. हा दिवस संपूर्ण देशात वेगवेगळ्या प्रांतात कसा साजरा केला जातो, काय आहेत त्या विविध पद्धती? आपण जाणून घेऊयात या लेखात.
कोण कोणते आहेत त्या पद्धती? |How is Hindu New Year celebrated all over India?
गुढी पाडवा
चैत्र प्रतिपदा, हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस. वसंताची चाहूल देणारा दिवस. प्रतिपदा या संस्कृत शब्दापासूनच हा पाडवा हा शब्द तयार झाला असावा. गुढीला आपल्या धर्मात ब्रह्मध्वज म्हणतात. हा सण आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपल्या शेजारी राज्य असणाऱ्या गोव्यातही साजरा केला जातो. महाराष्ट्रालगत असलेला केंद्रशासित प्रदेश दमण मध्येही हा सण साजरा करतात. कोंकणी हिंदूंमध्ये या दिवसाला नाव थोडं वेगळं आहे, हे लोक याला सौसार पडो सौसार पडवो किंवा पाड्यो असं म्हणतात. बाकी गुढी उभी करणं या प्रथा तिथेही महाराष्ट्रासारख्याच आहेत.
सिंधी नव वर्ष
आपल्या महाराष्ट्रात सिंधी समाजही आहे, आणि त्यांचंही हे नववर्ष आहे. हा दिवस सिंधी लोकांमध्ये छेत्रीचंद्र किंवा चेतीचंद नववर्ष म्हणून साजरा होतो. या शब्दाचा अर्थ चैत्राचा चंद्र असा आहे. त्याचबरोबर सिंधी समाजाचे आराध्य दैवत असणारे भगवान झुलेलाल यांचा हा उदय दिवस मानला जातो. आणि यादिवशी काही पदार्थ बनवले जातात. खास प्रकारचा गोड भात बनवला जातो, ज्याला ताहिरी असं म्हणलं जातं. त्याच्याबरोबर हरभऱ्याची डाळ घालून पालकाची खास सिंधी पद्धतीची भाजीही केली जाते, याला साई भाजी म्हणतात. आणि भगवान झुलेलाल याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि सगळे हा प्रसाद भक्षण करतात.
नवरेह
याला काश्मिरी नववर्ष म्हणलं जातं. काश्मिरी हिंदू चैत्राचा पहिला दिवस हा नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. खास करून हा सण काश्मिरी पंडित साजरा करतात. त्यांची आराध्य देवता माता शारिकाचा दिवस आहे अशी त्यांची धारणा आहे. पूर्वी ५००० ६००० वर्षांपूर्वी या दिवशी सप्तऋषींचा कालखंड सुरु झाला, अशी काश्मिरी पंडीतांची मान्यता आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका ताटात दही, रोटी, शिजवलेला भात, आक्रोड, शाईची दौत, लेखणी चांदीचं नाणं, नेची पत्री म्हणजे नवीन वर्षाचं पंचांग या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात. यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा ब्राह्म मुहूर्त पाहिला जातो. दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
उगादी
या दिवसाला संवात्सरादी या नावानं ही ओळखलं जातं. आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये या नावाने हा नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो. या दक्षिणी भागातल्या लोकांची हा सण साजरा करण्याची परंपरा सुद्धा अनोखी आहे. ते या दिवशी छान रांगोळी घालतात, ज्याला मुग्गुलू म्हणलं जातं. दारांना तोरणं लावली जातात. एकमेकांना नवीन वस्त्रे भेट म्हणून दिली जातात. तेल लावून अभ्यंग स्नान केलं जातं. उगादीला खास पदार्थ बनवला जातो, याच्या चवीबद्दल म्हणाल तर गोड, तिखट, आंबट, तुरट, कडवट, खारट अशा सगळ्या चवी तुम्ही यामध्ये अनुभवू शकता. अशा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाचं नाव आहे पचडी.
बिहू
बिहू हा सण आसाममध्ये साजरा होतो. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे आसाम प्रांतात बिहू वर्षातून तीन वेळा साजरा होतो. आसामी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा होणारा बिहू हा बोहाग किंवा रोंगाली बिहू म्हणून ओळखला जातो. वसंताच्या आगमनानिमित्त हा बोहाग बिहू साजरा केला जातो. हा सण एक आठवडा चालू राहतो. या काळात शेतकरी भाताच्या शेतीसाठी शेततळं तयार करत असतो आणि यामुळे वातावरणात उत्साह असतो. या दिवशी स्त्रिया खास पदार्थ बनवतात, याला पिठा, लारूस अशी नावं आहेत. पिठा हा गोड किंवा चमचमीत तिखट चवीचा असतो, तो गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठापासून बनवतात, या पिठाच्या पात्यामध्ये गोड किंवा तिखट सारण भरतात. लारूस हे तांदूळ आणि नारळाच्या रसापासून बनवलेला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे.
नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्याचा उत्साह, आनंद सर्वत्र सारखाच आहे. भले पद्धती किंवा नावं वेगळी असोत. आणि हीच आपल्या देशाची खासियत आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.