बुद्धिबळाची निर्मिती कशी झाली? | History of chess in marathi

बुद्धिबळ हा खेळ मूळचा आपला भारतीयच. जो की सुमारे पाच हजार वर्षापूर्वी खेळला जायचा. पण त्याचे नाव वेगळे होते. बुद्धिबळाला याआधी ‘चतुरंग’ नावाने ओळखले जायचे. यालाच शतरंज या नावाने देखील काही ठिकाणी ओळखले जाते. पुर्वीच्या काळात राजेराजवाड्यांच्या काळात चतुरंग सेना असायची. ज्याचा उपयोग लढायांसाठी केला जायचा. या सेनेत हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशा चार सेना असायच्या आणि यावरूनच हा चतुरंग खेळ अस्तित्वात आला.

ज्यात चार खेळाडू आणि चार रंगांच्या (काळा, हिरवा, तांबडा व पिवळा) सोंगट्या असत. प्रत्येक खेळाडूकडे राजा, हत्ती, घोडा, नौका आणि चार प्यादी अशा आठ सोंगट्या असत. पटात चौसष्ट घरे असत. त्या खेळाचे नियम आत्ताच्या बुद्धिबळापेक्षा वेगळे होते. हा खेळ फासे टाकून खेळला जायचा. ज्याला नंतर नंतर द्युताचे स्वरूप येऊ लागले आणि मग या खेळाला जुगार म्हणून खेळले जाऊ लागले.

बुद्धिबळाची निर्मिती कशी झाली? | History of chess in marathi

या जुगाराने खूपच भयानक रूप घेतले कारण यात लोक आपली जंगी मालमत्ता, सर्वस्व पणाला लावत पण एवढंच कायतर आपल्या शरीराचे अवयव, हात पाय, बोटे हे सुद्धा देत. या पटातील प्यादे व मोहरे हस्तिदंतापासून बनवले जात. तसेच त्यांचे आकार देखील खूप मोठे असत. त्यांची ने- आण नोकरांकडून केली जायची. पण पुढे पुढे त्याच्यावर बरेच कडक नियम, राजकीय निर्बंध आले तसेच फासे वापरण्यावर बंदी देखील आली. त्यामुळे यानंतर हा खेळ चौघांऐवजी दोघांमध्ये खेळला जाऊ लागला. ज्यात परत नियम बदलून चतुरंगाचे बुद्धिबळात रूपांतर झाले. हा बदल साधारणपणे इ. स. पाचव्या व सहाव्या शतकात झाला.

मात्र याचे नाव चतुरंग असेच ठेवण्यात आले होते. यात नंतर मोहऱ्यांच्या आणि प्याद्यांच्या हालचाली निश्चित करण्यात आल्या, फासे वापरण्यावर बंदी आल्याने खेळातील छक्के पंजे संपुष्टात आले आणि केवळ बौद्धिक कौशल्यासच प्राधान्य आले. पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत भारतात बुद्धिबळाच्या खेळात अनेक परिवर्तने होत गेली. हा खेळ राजे लोकांचा लोकप्रिय होता. कारण यात युद्धामध्ये कसे डोके चालवावे याचे धडे नकळत मिळवले जात. म्हणून काही राजे तर आपल्या सोबत निष्णात बुद्धीबळपटू बाळगत. अठराव्या शतकापर्यंत हा खेळ जगभर पसरला. तसेच वेगवेगळ्या देशात वेगवेगळया पद्धतीने खेळला जाऊ लागला.

सर्वसाधारणपणे जून्या काळात राजे महाराजे यांचेच वर्चस्व असायचे. त्यात राजा, राणी, शिपाई, हत्ती, घोडे, उंट हे महत्वाचे असत. कारण लढायांमध्ये यांचा वापर जास्त केला जात. म्हणून बुद्धिबळाची रचना सुद्धा याच गोष्टींचा विचार करून केली गेलेली असावी. कारण समोरच्या शत्रूंची चाल आधीच लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढण्यासाठी बुद्धिबळाचा वापर चांगल्या प्रकारे त्यांना होत असावा. हा खेळ खेळताना चाली कळतात, बुद्धीचा कस लागतो आणि पुढे जाऊन कसे संकट येईल आणि आले तर काय करायचे या सगळ्याचा सराव यातून केला जायचा. म्हणून या खेळाला विशेष महत्त्व आहे.

आजतागायत बुद्धिबळाच्या खेळावर जेवढी पुस्तके लिहिली गेली असतील तेवढी कोणत्याच खेळावर लिहिली गेली नाहीत हे विशेष! या खेळावर पहिले पुस्तक 1574 मध्ये प्रसिद्ध झाले. तर अठराव्या शतकात फीलीदॉरने ‘ॲनलिसिस ऑफ चेस’ हे पुस्तक लिहिले. यानंतर सुद्धा विपुल प्रमाणात बुद्धिबळावर लेखन केले गेले. सुमारे पाच हजार वर्षापूर्वी सुरू झालेला हा खेळ अजूनही तितकाच लोकप्रिय असून विश्वनाथन आनंद याने या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भारताचे नाव उज्वल केले आहे. असाच हा बुद्धिबळाचा डाव प्रत्येकाला एक एक घर पुढे सरकून आपल्या यशापर्यंत घेऊन जाण्यास सतत मदत करत राहावा. यामुळे प्रत्येक जण या निमित्ताने आपल्या बुद्धीचा योग्य वापर करेल आणि त्यांना बुद्धिकौशल्य वापरून विजयी होण्याची सवय देखील लागेल. काय मग आता मांडताय ना बुद्धिबळाचा पट ?

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button