“आई, मला पोळी नको, भाकर नको. मला फक्त जॅम आणि ब्रेड दे” असा बालहट्ट प्रत्येक घरात कधी ना कधी झाला असणार. शाळेत मधल्या सुट्टीत एखाद्याच्या डब्यात ब्रेड सँडविच दिसलं की सगळ्यांच्या उद्या त्यावर पडणार हे ठरलेलंच.. असा हा चहा पासून भाजी पर्यन्त अनेक पदार्थांना सोबत करणारा ब्रेड मूळचा परदेशातला . पण आता आपल्या रोजच्या खाण्यातला असा हा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत या ब्रेडने आपल्या घरात जागा पक्की केली आहे. ब्रेडचा इतिहास पाहिला, तर हजारो वर्ष जुना आहे. कागदी लगद्याच्या गोळ्यासारखा ब्रेड विकसित होत होत आपल्याला आता दिसतो तिथपर्यंत बदल त्याच्यात झाले आहे. इतिहासानुसार, सर्वात प्रथम ब्रेड मध्य पूर्वेकडे, विशेषतः इजिप्तमध्ये इसपी सनपूर्व 8000च्या सुमारास बनवला गेला होता.
ब्रेडचा हजारो वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | History of bread in marathi
ग्रीक आणि रोमन (How was bread discovered?) साम्राज्याच्या काळातही माणसाने वेगवेगळे धान्य गोळा करून ते एकत्र केलेले मिश्रण पाण्याच्या सानिध्यात ठेवून त्यावर प्रक्रिया केली. हे मिश्रण गरम केल्यावर, भाजल्यावर जास्त काळ टिकते हे लक्षात आल्यावर त्याच्या सेवनात मोठी वाढ झाली. भारतात ब्रेडसंदर्भातील बेकिंग, मैद्याच्या वापराचे संदर्भ सापडत नाहीत. त्यामुळे ब्रेड भारताच्या खाद्य संस्कृतीचा भाग आधी नव्हता. आज मात्र सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी असा एक हा पदार्थ आहे.
आशियातील बहुतेक भागांमध्ये धान्य म्हणून, तांदळाच्या वापरास प्राधान्य दिले जात असले, तरी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्य ब्रेड अधिकाधिक लोकप्रिय झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर, तर ब्रेड अधिक वेगाने विस्तारला. आज आशियाई आणि युरोपीय देशांमध्ये विविध प्रकारचे ब्रेड खाल्ले जातात. तर आपल्याकडेही नेहमीच्या व्हाईट ब्रेडसोबतच मैदा नसलेला पण गव्हापासून बनविलेला ब्राऊन ब्रेड, सर्व धान्य प्रकार एकत्र करून बनविलेला मल्टिग्रेन ब्रेड तसेच ग्लूटेन फ्री ब्रेडला मागणी वाढली आहे.
ब्रेड आता आपल्या इतका जवळचा झाला आहे, की आपल्या आसपासच्या खेडेगावांमध्येही तो सहज मिळू शकतो आणि तितक्याच चवीने ते चाखलाही जातो. भारतामध्ये एक वेळ, तर अशीही होती की ब्रेड, पाव खाल्ला म्हणजे धर्म बदलला असं मानलं जात होत. त्यामुळे ब्रेड खाणं निषिद्ध मानलं जायचं. चुकून एखाद्याने खाल्लाच, तर आता तू ख्रिस्तधर्मीय झाला, असं म्हटलं जात. आता हाच ब्रेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण सगळेच आवडीने खातो. ब्रेडपासून वेगवेगळे पदार्थ बनवतो. पाववडा, ब्रेड पकोड्यापासून, सॅण्डविच, बर्गर आपल्याला आनंद देतात. छोट्याशा गाडीपासून ते मॉलमधल्या एखाद्या चकचकीत दुकानापर्यंत आपल्याला ब्रेडचे अनेक पदार्थ दिसतात ते ग्राहकांच्या असलेल्या पसंतीमुळेच.
हल्ली आरोग्याच्या दृष्टीने ब्रेड, पाव खाऊ नये असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. किंवा या पदार्थाचं सेवन कमी प्रमाणात असावं, असा सल्ला दिला जातो. पण तरीही हा पदार्थ खाण्याची चटक संपत नाही. उलट ब्रेडपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या, सगळ्यात मोठा ब्रेड बनवून विक्रम बनवण्याच्या गोष्टी आपल्याला आपल्या आसपास सहज दिसतात. यावरुनच भारतीयांचं ब्रेड प्रेम दिसून येतं.
ब्रेडमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले आहेत. कदाचित ते पुढेपण होत राहतील. पण या पदार्थाची जागा दुसरं कोणी घेऊ शकेल, असं वाटत नाही. वेगवेगळ्या देशांमध्ये बनणाऱ्या ब्रेडचा प्रभाव आता आपल्या देशावर पक्का झाला आहे. परदेशातून आलेला हा पदार्थ आता आपल्याला परका राहिलेला नाही हेच त्यातून दिसून येतं.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.