भारतामध्ये सर्वत्र आल्याची पैदास होते. आल्याचे रोप वाढीला लागते त्यावेळेसच त्याच्या मुळाशी गाठी निर्माण होतात त्यांनाच ‘आले’ असे म्हणतात. आले शिजवून सुकवले की त्याची सुंठ तयार होते. आले जमिनीत पुरून त्यावर थोडे थोडे पाणी घातल्याने ते बराच काळ ताजे राहते व आवश्यक असेल तेव्हा ताजे आले आपणांस मिळते.
आले खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Health Benefits of Ginger in Marathi
- आले (Ginger) तीक्ष्ण, अग्नीप्रदीपक, वायूहारक, तिखट, कफहारक, उष्ण व रुक्ष आहे.
- आले भोजनाच्या पूर्वी मिठाबरोबर खाणे हितावह मानले जाते. अरुचीवर त्याचा फायदा होतो.
- आले व गूळ एकत्र करून चांगले ठेचावे व त्याचा रस नाकात टाकल्याने अर्धशिशीवर फायदेशीर ठरतो.
- आले व पुदिन्याच्या रसात थोडे सैंधव घालून प्यायल्याने पोटशूळ बरा होतो.
- अरुची वाढणे, गॅसचा त्रास, करपट ढेकरा येणे, अपचन, भूक न लागणे, मलावरोध होणे यांवर सोपा उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात तेवढाच लिंबाचा रस घेऊन त्यात थोडे सैंधव घालून रोज सकाळी प्यावे.
- आले व कांद्याचा रस एकत्र करून चमचाभर प्यायल्याने उलटी बंद होते.
- दोन चमचे आल्याच्या रसात चमचाभर मध घालून प्यायल्याने घशात साचलेला कफ मोकळा होऊन पडतो. पोटातील वायू दूर होतो. जठराग्री प्रदीप्त होतो. खोकल्यामध्ये तसेच श्वास लागणे, दम लागणे आदी विकारांवरही हमखास गुण येतो.
- आल्याचा व पुदिन्याचा काढा करून ताप आलेल्या व्यक्तीस दिल्याने धाम येतो व तापही उतरतो. थंडी वाजून ताप आल्यास या काढ्याचा वापर केला असता गुण येतो.
- आले, लिंब यांचा रस व त्यात सैंधव घालून प्यायले असता खोकला, मलावरोध, कफ, वायू व मंदाग्नीवर फायदा होतो. हा रस जेवण्यापूर्वी घेतल्याने अग्नी प्रज्वलित होऊन मुखशुद्धी होते तसेच भूकही चांगली लागते व खाल्लेल्या अन्नाचे पचनही होते.
- आल्याच्या रसामध्ये चार पट साखर घालून त्याचा पाक करावा. हा आलेपाक अत्यंत फायदेशीर ठरतो. एक चमचाभर आलेपाकात पाणी घालून ते दिवसातून दोन-तीन वेळा घेतले असता आमदोष किंवा गॅसमुळे पोटातून येणारी कळ थांबते. शौचाला साफ होते. पोटात धरलेला वायूही निघून जातो.
हे सुध्दा वाचा:– मेथी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- आलेपाकामध्ये वेलची, जायफळ व लवंग घालून हा पाक बरणीमध्ये भरून ठेवावा. दररोज थोडा थोडा पाक आहारात घेतला असता अग्नीमांद्य, अरुची, कफविकार, वायूविकार, आमवृद्धी यांवर फायदा होतो.
- अंग थंड पडले असेल तर लसूण व आले एकत्र करून त्याचा रस काढून अंगाला चोळल्याने अंगात उष्णता येते.
- आल्याचा रस गरम करून नंतर त्याचे कोमट थेंब कानात घातल्याने ठणका मारणे बंद होते.
- लहान मुलांना दूध पचत नसेल तर दूध उकळवताना त्यात आले टाकून ते दूध दिले असता चांगले पचते.
- आवाज बसला असता किंवा घसा दुखत असेल तेव्हा आले, लवंग व मीठ एकत्र करून खावे.
- सर्दी झाली असता चहामध्ये आले ठेचून घालावे व तो चहा प्यावा.
- आल्याचा रस खडीसाखरेबरोबर घेतल्यास भोवळ येणे, चक्कर येणे बंद होते.
- पिंपळीची पूड व सैंधव आल्याचे रसात एकत्र करून त्याचे नस्य केले असता वातविकारामध्ये उद्भवणारी डोकेदुखी बरी होते.
- मोरंबा, लोणचे, पाक आदी माध्यमांतून आल्याचे सेवन आपल्या आहारामध्ये नित्यनेमाने ठेवल्यास अनेक विकारांचे हरण होते परंतु अत्यंत गुणकारी अशा या आल्याचा वापर मात्र जपून करावा. आपली प्रकृती पाहूनच आले वापरावे. उन्हाळा किंवा पावसाळ्यात, ज्यांना कोरडा खोकला, उदरव्रण, आम्लपित्त, रक्तदाब, पांडुरोग, मूत्रविकार आदींचा त्रास आहे त्यांनी आल्याचे (Benefits of Ginger) सेवन टाळावे.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.