मधुमेह दूर साठी ‘मेथी’ गुणकारी | Fenugreek Benefits in Marathi

मेथी कडू असते, परंतु गुणकारी आहे. मेथीच्या नित्य सेवनाने मधुमेह बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. केवळ मधुमेहावरच नव्हे तर अनेक असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांवर मेथी अप्रतिम औषध आहे. जगभरातील एकपंचमांश लोकांना मधुमेहाने पिडले आहे.

अजून तरी ॲलोपॅथीमध्ये मधुमेह दूर करणारे हमखास गुणकारी औषध नाही. कृत्रिम पद्धतीने तयार केलेले इन्शुलिन रोज देऊन शरीरातील साखर जाळण्यात येते. शरीरात साखर वाढू न देण्याची कसरत डॉक्टर मंडळी करतात. मेथी अशा रुग्णांना दिलासा आहे.मेथी मधुमेह नाहिसा किंवा कमी करते.

मधुमेह दूर साठी मेथी गुणकारी | Fenugreek Benefits in Marathi

मधुमेहावर मात करण्याचा घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय आहे. दररोज रात्री सरबताच्या रिकाम्या बाटलीत अर्धा मूठ मेथी टाका आणि बाटली पूर्ण भरा. बारा तासांनंतर म्हणजे सकाळी उठल्यावर बाटलीतील मेथी थोडी फुगलेली दिसेल. बाटली हलवा व ते पाणी दिवसभर प्या. फुगलेली मेथी भाजी-आमटीत टाका, म्हणजे वाया जाणार नाही. असे नित्यनियमाने महिनाभर करा. लघवीतून साखर जाण्याच्या विकारात तुम्हाला आश्चर्यजनक सुधारणा झालेली दिसेल. मेथी कडू असल्यामुळे मधुमेहाच्या विकारात गुणकारी ठरली आहे. मेथीच्या सेवनाने मधुमेहासारखा चिवट रोग दूर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

वातव्याधीवर मेथी गुणकारी आहे. वातविकार प्रामुख्याने थंडीतच उफाळून येतात. संधिवात, आमवात यांसारखे जीर्ण विकार एकदा का उफाळून आले की, ‘ रोग नको, मज मरण हवे ‘ अशी रुग्णाची अवस्था होते. अशा रुग्णांनी थंडी सुरू होण्यापूर्वीच मेथी खाण्यास सुरुवात करावी. मेथीची भाजी आहारात घ्यावी. मेथीचे पाणी प्यावे. मेथीचे लोणचे करून खावे. तसेच मेथीचे लाडू खावेत.

मेथीचा लाडू

नेहमी अंगातून व हातापायातून कळा येतात अशा तक्रारींवर मेथीचा लाडू दिवसातून एक नियमित खावा. बाळंतिणीस मेथीचा लाडू म्हणजे संजीवनीच आहे ! मेथीच्या लाडूमुळे बाळंतिणीस शक्ती तर येईलच, पण बाळंतपणानंतर जे वातविकार उद्भवतात तेही उद्भवणार नाहीत. बाळंतपणात प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे चाळीशीनंतर अनेक प्रकारच्या व्याधी उद्भवतात. कॉम्रेड डांगे म्हणत असत की, ‘तरुणपणी व्यायाम केला पाहिजे, हे माणसाला साठीनंतर कळते. ‘त्याचप्रमाणे बाळंतपणात प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवे, हे चाळिशीनंतर कळते. म्हणून किमान बाळंतिणीने मेथीचे लाडू करून खावे.

अनेक रोगांवर मेशीपाक

मेथीचा लाडू जसा अनेक रोगांवर गुणकारी तसा मेथीपाकही गुणकारी ! मेथीपाकात मेथी आणि त्या सोबतच आणखी 14 औषधे असल्यामुळे मेथीपाकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेथीपाक थंडीत खाल्ला की, अधिक लाभ देतो.

मेथीपाक घरातही बनविता येतो. तो जरूर जरूर घरी करावा, तरुणांपासून आबालवृद्धापर्यंत सर्वांनी मेथीपाकाचा लाभ घेऊन आरोग्य उत्तम राखावे. असा लाभ सर्वांनाच लाभावा म्हणून मेथीपाक बनविण्याची साधी, सोपी कृती सांगतो. ती वाचल्यानंतर मेथीपाक आपण बनविल्याशिवाय राहणार नाही.

मेथी व सुंठ प्रत्येकी 32 तोळे घ्या. त्याचे वस्त्रगाळ चूर्ण बाजारात मिळते ते घ्या. पिंपरी, सुंठ, गंठोडा, चित्रक, ओवा, धने, जिरे, बडीशेप, जायफळ, षटकपावडर, दालचिनी, तमालपत्र आणि नागरमोथा प्रत्येकी चार तोळे घ्या. मिरे सहा तोळे घ्या व हे सर्व जिन्नस चांगले कुटा.. त्यानंतर 50 मि.लि. दुधात 32 तोळे तूप टाकून त्यात मेथी व सुंठ

यांचे चूर्ण मिसळावे व त्याचा विस्तवावर पाक करावा. त्यानंतर उरलेली औषधे टाकावीत. हा पाक काचेच्या बरणीत भरून ठेवावा. या पाकालाच ” मेथीपाक’ म्हणतात. हा मेथीपाक वातरोग, आमवात, अम्लपित्त, बाळंतरोग, हिस्टेरिया, प्रदररोग, नेत्ररोग यावर फारच गुणकारी आहे. हे रोग मेथीपाकाने बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मेथीपाक सकाळ संध्याकाळ दोन चमचे सेवन करावा. त्यावर कपभर दूध प्यावे. त्याने शरीर सुदृढ बनते. स्त्री व पुरुषांनी दोघांनाही हा घ्यावा. दोघांनाही तो गुणकारी आहे.

मेथीतील तेलाचा प्रभाव

वैज्ञानिकांच्या मते मेथीमध्ये एक प्रकारचे तेल आणि फॉस्फरिक ॲसिड असते. त्याचा कातडीवर उत्तम प्रभाव पडतो.

मेथीची सुकडी

कित्येकांना हातापायातून चमका येतात किंवा वातामुळे अवयव जखडल्यासारखे होतात. अशांनी कितीही औषधे घेतली तरी गुण येत नाही. त्यांनी खालील प्रयोग करून पहावा. मेथी तुपात चांगली भाजावी. त्यानंतर ती दळावी व त्याचे पीठ बनवावे. तूप व गुळाचा पाक करून त्यात ते पीठ मिसळावे व त्याची सुकडी तयार करावी. या सुकडीच्या नारळीपाकासारख्या वड्या पाडाव्यात. दररोज सकाळी दोन-तीन वड्या खाल्ल्यास वातविकाराने उद्भवणाऱ्या तक्रारी नाहिशा होतात.

मेथीच्या कोवळ्या पानाची भाजी

मेथीच्या कोवळ्या पानाची भाजी आपल्या जेवणात आठवड्यातून दोन तीन वेळा अवश्य ठेवा. कारण या भाजीमुळे रक्त शुद्ध तर होतेच पण पोटही साफ राहते. मलावरोधासारख्या तक्रारी पार नाहीशा होतात. मूळव्याधीचे मूळ कारण मलावरोध हे आहे. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी जरूर जरूर मेथीची भाजी आहारात ठेवावी.

मेथीच्या दाण्याची उसळ

मेथीच्या हिरव्या पानाची भाजी जशी मलावरोध व मूळव्याधीला गुणकारी तशीच मेथीच्या दाण्याची उसळही गुणकारी आहे. मेथीच्या दाण्याची चवदार उसळ बनवा व ती रोजच्या जेवणात अधूनमधून खा. त्याने पोट साफ होईल. पोटाच्या तक्रारी पार नाहीशा होतील.मेथीच्या दाण्याचे पीठ ताकात मिसळून घेतल्याने आमयुक्त अतिसार बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कितीही जुना आमातिसार असो, तो हमखास बरा होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button