दुधी भोपळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Bottle Gourd Health Benefits in Marathi

केस गळण्याची तक्रार ही इतकी सरसकट आहे की, दहाजणींमध्ये आठजणी तरी ही तक्रार सांगतातच. पुरुषांपेक्षा स्त्रियांना केसांची स्वाभाविकच फार काळजी वाटते. अलीकडे तरूण वयात पुरुषांचेही केस जाऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर दुधीच्या तेलाचा उपचार जरूर करण्यासारखा आहे. हे तेल घरच्या घरी करता येण्यासारखे आहे.

आहारासारखे उत्तम औषध नाही. आहार हे सर्वश्रेष्ठ औषध आहे. आहार रहस्य जो जाणून घेईल आणि त्यानुसार जो आचरण करील त्याला रोग शिवणार नाहीत. आयुर्वेदात आहाराची महती संगीत नाटकातील गाण्याच्या धृपदासारखी गायिली आहे. उत्तम दर्जाचे औषध हेसुद्धा आहाराशिवाय व्यर्थ आहे.

आहारात फळे, फळभाज्या, पालेभाज्या, कंदमुळे, कडधान्ये, दूध व दुधापासून बनविलेले पदार्थ आणि मांसाहार यांचा समावेश होतो. या आहारामुळे माणसाच्या शरीराचे पोषण होते.

दुधी भोपळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Bottle Gourd Health Benefits in Marathi

आज आपण दुधी या फळभाजीचा उपयोग पाहणार आहोत. ही फळभाजी आहारात आपण नेहमीच उपयोगात आणतो. मात्र त्याचे औषधी उपयोग आपल्याला माहिती नसतात. आपण भाज्या आहारात स्वीकारतो. मीठमसाला टाकून खातो. चवीचा विचार करतो. परंतु भाज्यांमधील गुणधर्माचा बिलकुल विचार नसतो. एक लक्षात ठेवले पाहिले की, जे आपण तोंडाद्वारे पोटात ढकलतो त्यावर आपल्या शरीराचे पोषण अवलंबून आहे. इतकेच नव्हे तर माणसाचे निरोगीपण व आजारपणही त्यावर अवलंबून आहे. म्हणून आहारात आपण काय खातो याला फार महत्त्व आहे !

स्वस्त व बारमाही दुधी

दुधी भोपळा ही भाजी बाराही महिने मिळते. ही भाजी भरपूर मिळते व अन्य भाज्यांच्या मानाने स्वस्तही असते. दोन प्रकारचे दुधी मिळतात. एक लांबट दुधी आणि दुसरा गोल दुधी ! दुधी भोपळ्याचा वेल असतो. भाजीसाठी आणि औषधांसाठी कच्चे फळच वापरतात. दुधी भोपळ्याच्या बियांचाही औषधासाठी उपयोग करतात.

मानसिक विकारांवर दुधी भोपळा हा रामबाण उपाय आहे. आज मानसिक तणाव सर्वत्र वाढत आहेत. विशेषत: शहरात धकाधकीच्या जीवनात या तणावाची तीव्रता सतत जाणवते. बहुसंख्य लोक मानसिक तणावाखाली वावरत असतात. परिणामी भूक न लागणे, हातापायांना मुंग्या येणे, छातीत धडधडणे, बेचैनी वाढणे, भयग्रस्त राहणे, चिडचिडे वाटणे, निराशा वाटणे आदी लक्षणे निर्माण होतात. अशा लक्षणांवर दुधी भोपळ्याचा रस अत्यंत परिणामकारक आहे.

शंभर ग्रॅम दुधी भोपळा घेऊन त्याची साल काढा आणि तो किसा. सदर कीस रुमालात दाबून त्याचा रस काढा. हा रस दोन ते चार चमचे निश्चितच निघतो. त्यात एकचतुर्थांश जिरे आणि एक चमचा मध घाला. हा रस दररोज सूर्योदयाच्या वेळी रिकाम्या पोटी घ्यावा. रस घेतल्यानंतर तासभर काहीही खाऊ नये. असे बेचाळीस दिवस घेतल्यानंतर निश्चित परिणाम दिसतो. मानसिक व्याधी असणाऱ्यांनी काही काळपर्यंत हा रस घ्यावा. मानसिक व्याधींवर मनोविकार – तज्ज्ञाशिवाय घरगुती उपचाराने निश्चितच विजय मिळवता येईल. ज्यांना दम्याचा विकार आहे आणि जीर्ण सर्दी, खोकला आहे, त्यांनी मात्र हा उपचार करू नये.

मूळव्याधीवर उपाय

मूळव्याध का होते ? वारंवार मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे, सतत बैठी कामे करणे, स्कूटरसारखी वाहने दीर्घकाळ वापरणे, मलबद्धता आदी कारणांच्या परिणामी मूळव्याध उद्भवते. अशांनी दुधी भोपळ्याची भाजी नियमाने खावी. मूळव्याधीत आराम पडतो. मात्र दुधी भोपळा कोवळा असावा. त्याने आम्लपित्ताचा त्रासही कमी होतो.

ज्याचा पोटाचा कोठा साफ नाही त्याच्या देहात आरोग्य नांदत नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. लहान आतड्याची अन्नरस शोषणाची शक्ती कमी होते. मलबद्धता किंवा आव, आमांश, अपचन यांसारखे विकार उद्भवतात. अशापैकी कोणताही विकार उद्भवला तर जून दुधी भोपळा घ्या. त्याची साल काढून तो किसा आणि तुपावर परतून घ्या. चवीनुसार खडीसाखर, सैंधव, जिरे, मिरे घाला आणि नियमाने सकाळ व संध्याकाळ घ्या. आश्चर्यकारक परिणाम दिसू लागतील. देहस्वास्थ्य सुधारलेले दिसेल. विकारांची लक्षणे दूर झालेली असतील.

केसांच्या तक्रारींवर तेल

केस गळण्याची तक्रार ही इतकी सरसकट आहे की, दहाजणीमध्ये आठजणी तरी ही तक्रार सांगतातच. पुरुषांपेक्षा स्त्रियांना केसांची स्वाभाविकच फार काळजी वाटते. अलीकडे तरूण वयात पुरुषांचेही केस जाऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यौवन दूधीच्या तेलाचा उपचार जरूर करण्यासारखा आहे. हे तेल घरच्या घरी करता येण्यासारखे आहे.

अर्धा लिटर दुधी भोपळ्याचा रस घ्या. त्यात शंभर ग्रॅम मेथीचूर्ण टाका. नंतर तिळाचे तेल एक लिटर आणि पाणी एक लिटर मिसळून तेल शिल्लक राहीपर्यंत उकळा. हे झाले तेल तयार. हे तेल काचेच्या बाटलीत गाळून ठेवावे आणि दररोज रात्री झोपताना डोक्यावर लावावे.

उष्णतेचे विकार आणि दुधी

लघवीच्या जळजळीवर वैद्य रमेश नानल यांनी दुधी भोपळ्याचा उत्तम उपयोग दिला आहे. अती मद्यपान करणे, सतत उन्हात फिरणे, रात्र रात्र जागरणे करणे यामुळे उष्णता वाढते आणि लघवीच्या जळजळीसारखे विकार उद्भवतात. अशा विकारात दुधी भोपळ्याचा रस रामबाण आहे.

एक कप दुधी भोपळ्याच्या रसात एक मोठा चमचा लिंबूरस मिसळा. त्यात एक मोठा चमचा धणे चूर्ण टाका आणि दर तीन तासांच्या अंतराने हे मिश्रण घ्या. जसजसे हे मिश्रण घेत जावे तसतसा लाभ पदरी पडतो आणि विकार दूर होतो असा अनुभव येईल.हातापायांच्या भेगांवरही अन्य मलमांपेक्षा एरंडेल तेलात दुधीचा रस मिसळून चोळल्यास फारच लाभ होतो.

अतिवाचनाने व अतिजागरणाने डोळे लाल होतात, वेल्डिंग लागूनही डोळे लाल होतात व खुपतात. अशा वेळी दुधी किसून त्याचा कीस डोक्यावर बांधल्यास सर्व लक्षणे दूर होऊन डोळे पूर्ववत होतात.असे आहेत दुधीचे औषधी उपयोग.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button